Success Story:- एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मजात काही कौशल्य आणि गुण असतात आणि जर अशा कौशल्याला आणि गुणांना जर संधी दिली किंवा वाव दिला तर नक्कीच त्या कौशल्यांना धरून अशी व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. बऱ्याच व्यक्तींकडे अलौकिक स्वरूपाची बुद्धिमत्ता असते व या बुद्धिमत्ताच्या जोरावर ते खूप मोठी प्रगती करतात.असे व्यक्ती आपल्याला अनेक क्षेत्रात दिसून येतात व याला शैक्षणिक क्षेत्र देखील अपवाद नाही.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की अनेक कठीण विषयांच्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक व्यक्ती मोठमोठी कोचिंग क्लासेस चालवतात. कारण अशा व्यक्तींमध्ये ती क्षमता असते व ते विद्यार्थ्यांना घडवू शकतात. अगदी याच पद्धतीने जर आपण फिजिक्सवाला या नावाने प्रसिद्ध असलेले शिक्षण क्षेत्रातील एक प्रसिद्ध नावाचा विचार केला तर ते नाव म्हणजे अलख पांडे हे होय.
यांनी देखील त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कठीणातल्या कठीण परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत केलेली असून त्यांची कंपनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठे काम करत आहे व या कंपनीची आज भरारी पाहिली तर तिचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.
कोण आहेत अलख पांडे?
शैक्षणिक क्षेत्रामध्ये फिजिक्सवाला या नावाने गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध झालेले अलक पांडे हे उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील रहिवासी असून लहानपणापासून अभ्यासामध्ये अतिशय हुशार असे हे व्यक्तिमत्त्व आहे. बऱ्याच जणांप्रमाणे त्यांची देखील आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे आजकाल त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागले. अलक पांडे यांच्या आई वडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी घर विकण्याची देखील पाळी आली.
जर आपण अलख पांडे यांचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर त्यांनी सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज येथील बिशप जॉन्सन शाळेमध्ये घेतले व माध्यमिक मध्ये त्यांनी 91 टक्के आणि बारावी 93.5% गुण मिळवून स्वतःच्या अनन्य साधारण बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर मात्र कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्याच्या दृष्टिकोनातून एका कोचिंग क्लासेस मध्ये तीन हजार रुपये प्रतिमहिना पगारावर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम हाती घेतले.
हे काम करत असताना त्यांचा शिक्षणाचा प्रवास अडचणीतून सुरू होता व या अडचणी मधूनच त्यांनी 2015 मध्ये कानपूर आयआयटीतून बी टेकचे शिक्षण पूर्ण केले व त्याच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. हा सगळा प्रवास सुरू असताना मात्र त्यांनी संस्थेतील त्यांचा सहकारी प्रतीक माहेश्वरी यांनासोबत घेऊन 2017 मध्ये फिजिक्सवाला या नावाचे यूट्यूब चैनल सुरू केले व फिजिक्स अर्थात भौतिक शास्त्राशी संबंधित अनेक लेक्चरचे व्हिडिओ त्यांनी या यूट्यूब चैनल वर अपलोड केले.
हे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओज ना मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळायला लागले. हे यूट्यूब चैनल आणि त्यांनी विकसित केलेले ॲपच्या माध्यमातून रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्राचे जे काही कठीण प्रश्नांची उत्तरे आहेत ते अगदी सहजपणे देत असतात व लवकरच विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले.
त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांच्या फिजिक्स वाला या youtube चॅनल ने 69 लाख सबस्क्राईबचा टप्पा पार केला व त्यांचे हे फिजिक्स वाला ॲप्स देखील 50 लाख जणांनी डाऊनलोड केले. त्यानंतर मात्र त्यांनी फिजिक्सवालाला कंपनी ॲक्ट मध्ये समाविष्ट केले. त्यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी यांनी देखील आयआयटी बीएचयु मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असून अलक पांडे यांच्यासोबत ते काम करतात व संपूर्ण व्यवसायाची देखरेख तेच करतात.
त्यांच्या या फिजिक्स वाला एडटेक कंपनीची नेटवर्थ 1.1 बिलियन पर्यंत पोचली आहे. एवढेच नाही तर शंभर मिलियन डॉलरची गुंतवणूक असलेल्या म्हणजेच युनिकॉर्न कंपन्यांमध्ये ही देशातील 101 वी कंपनी मधून समाविष्ट झाली आहे. अलक पांडे यांना अनअकॅडमी कडून तब्बल वार्षिक चार कोटी रुपयांच्या नोकरीच्या ऑफर देण्यात आली होती व त्यांनी ती नाकारली होती. एवढेच नाही तर त्यानंतर मात्र साडेसात कोटी रुपयांची ऑफर देखील त्यांनी नाकारली होती.
अशा पद्धतीने अलक पांडे यांनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान व बुद्धिमत्ता याचा उपयोग इतर विद्यार्थ्यांना करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेले फिजिक्सवाला हे यूट्यूब चैनलच्या माध्यमातून आज त्यांची कंपनी उभी राहिली व आज या कंपनीचे मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन पाहिले तर ते नऊ हजार कोटींच्या घरात आहे.