रिटायरमेंट हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आयुष्य चांगले जगता यावे या दृष्टिकोनातून अनेक जण नोकरी करत असतानाच निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षितता निश्चित करून ठेवतात. आयुष्याचे राहिलेले दिवस मजेत कुटुंबासमवेत घालवण्याचा व आयुष्याची मजा घेण्याचे बरेच जण ठरवतात.
परंतु समाजामध्ये असे अनेक व्यक्ती दिसतात की ते सेवानिवृत्तीनंतर देखील काहीतरी काम करण्यात व्यस्त असतात व त्यातच धन्यता मानतात. अशाच एका सेवानिवृत्त असलेल्या लष्करी जवानाने सेवानिवृत्तीनंतर आरामात आयुष्य न काढता शेती करण्याचे ठरवले व भाजीपाला शेतीतून लाखोंच्या उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. याच सेवानिवृत्त जवानाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त जवानाने केली भाजीपाला शेती
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्यातील पिंपराकोठी या गावचे रहिवासी असलेले राजेश कुमार हे भारतीय लष्करामध्ये होते. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. परंतु सेवानिवृत्तीनंतर काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी घरची शेती करण्याचे ठरवले. शेतीची सुरुवात करताना त्यांनी सगळ्यात आधी पपई लागवडीचा प्रयोग केला. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी त्यांना 12 लाख रुपयांचे उत्पन्न पपई लागवडीतून मिळाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी केळी आणि हिरव्या भाजीपाल्याची शेती सुरू करण्याचे ठरवले.
भाजीपाला शेतीत त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड करण्याचे ठरवले. या माध्यमातून त्यांचे दररोज 300 दुधी भोपळे बाजारामध्ये विक्रीसाठी जातात व दररोज त्यांना चार ते पाच हजार रुपये या माध्यमातून मिळतात. अशाप्रकारे निव्वळ दुधी भोपळा विक्रीतून ते महिन्याला दीड लाख रुपयांची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे राजेश कुमार यांनी दर्जेदार भाजीपाला पिकवल्यामुळे ते बाजारात विक्रीसाठी न जाता व्यापारी त्यांच्या बांधावर येऊन भाजीपाल्याचे खरेदी करतात. जर आपण त्यांचा दुधी भोपळा लागवडीचा खर्च पाहिला तर तो दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत आला.
यामध्ये संपूर्ण खर्च वजा करतात ते महिन्याला दीड लाख रुपयांचा नफा दुधी भोपळा विक्रीतून कमावत आहेत. मजुरांच्या माध्यमातून ते सगळ्या कामांची नियोजन करतात व जमिनीची मशागत तसेच खते व बी बियाणे यांचे व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यामुळे त्यांना भाजीपाला पिकातून खूप चांगला फायदा मिळत आहे. म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करणे आणि व्यवस्थित तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाला कष्टाची जोड देऊन शेती केली तर नक्कीच फायद्याचे होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.