Success Story : शेती ही सर्वस्वी निसर्गावर आधारित आहे. निसर्गाची कृपा राहिली तर शेतीतून समाधानकारक असे उत्पादन मिळते नाहीतर अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून शेतीचा खर्च भागवावा लागतो. यामुळे अलीकडे अनेक नवयुवक तरुणांनी शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगधंद्यात आपले करिअर सुरु केले आहे.
निश्चितच, शेतकरी बांधवांना शेती करताना नानाविध अशा संकटांचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी ढगाळ हवामान, कधी गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. अनेकदा या संकटांचा सामना करत बहु कष्टाने शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतो मात्र शेतमालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नाही.
शासनाची कुचकामी धोरणे, उद्योगाची लॉबी, व्यापाऱ्यांचा धूर्त स्वार्थीपणा यामुळे शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही परिणामी या अशा सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून चांगल उत्पन्न मिळत नाही. म्हणून शेतकरी बांधव कर्जबाजारी होतात. अनेकदा कर्जाला कंटाळून शेतकरी बांधव टोकाचा निर्णय घेत आत्महत्यासाठी विवश बनत असतात. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहे.
ही निश्चितच एक चिंतेची बाब आहे. मात्र अलीकडे राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आपलं वेगळंपण सिद्ध केलं असून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने भाजीपाला लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या मौजे फेस येथील शेतकरी अनिल पटेल यांनी भाजीपाला शेतीतून लाखोंचीं कमाई करून दाखवली आहे.
अनिल यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेत जमीन आहे. ते आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने पारंपारिक पिकांची शेती करत. परंतु पारंपारिक पिकांमध्ये उत्पादन खर्च अधिक आणि हाती मिळणारे उत्पादन कमी असं चित्र होतं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग सुरू केला. त्यांनी भाजीपाला शेतीचा प्रयोग केला. टोमॅटो आणि मिरची या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात त्यांनी शेती सुरू केली.
अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देखील त्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीवर टोमॅटो पिकाची शेती सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे या दोन एकरासाठी त्यांनी एक लाख 35000 चा खर्च केला आहे. सध्या स्थितीला या टोमॅटो पिकाची हार्वेस्टिंग सुरू असून या पिकातून त्यांना पाच लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज आहे. निश्चितच पारंपारिक पिकांच्या शेतीच्या तुलनेत टोमॅटो पिकाच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.