Successful Farmer : शेती हा मोठा आव्हानात्मक व्यवसाय आहे. या व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी कायमच घातक ठरतो. याशिवाय अनेकदा शेतकऱ्यांना बहु कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील चांगला दर मिळत नाही. तसेच शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
मात्र, बळीराजाच्या पाचवीला संकटे पूजलेले असतानाही अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या नवनवीन आणि कौतुकास्पद अशा प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली कमाई करून दाखवत आहेत. असाच काहीसा प्रयोग धुळे जिल्ह्यातून समोर येत आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या अर्धे खुर्द येथील एका उच्चशिक्षित तरुणाने शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग करत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून केळी लागवड केली आहे.
या उच्चशिक्षक तरुणाने केलेला हा केळी लागवडीचा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होणार आहे. विशेष बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी उत्पादित केलेली केळी चक्क इराण या देशात निर्यात झाली आहे. यामुळे सध्या या उच्चशिक्षित तरुणाचा हा भन्नाट प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. मौजे अर्धे खुर्द येथील सत्यपाल गुजर नामक उच्चशिक्षित तरुणांनी हा प्रयोग केला आहे. दरम्यान आज आपण सत्यपाल यांच्या या प्रयोगाबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
वास्तविक, सत्यपाल गुजर हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीमध्ये सरकारी नोकरदार म्हणून कार्यरत आहेत. आपली ही नोकरी सांभाळत त्यांनी शेती देखील यशस्वीरीत्या करून दाखवली आहे. नोकरीबरोबरच वडिलोपार्जित शेती करण्याचा हा निर्णय निश्चितच त्यांच्यासाठी आव्हानात्मक होता मात्र तरीदेखील त्यांनी योग्य नियोजन आखून शेती आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळल्या आहेत. सत्यपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एप्रिल 2022 मध्ये अजित सीड कंपनीच्या जी नऊ या केळी रोपाची लागवड केली.
टिशू कल्चर ने तयार करण्यात आलेल्या या रोपांमुळे केळीचे पीक चांगलं जोमदार बहरलं. एप्रिल मध्ये लागवड केली आणि नऊ महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेली केळी आखाती देशांमध्ये निर्यात झाली. आखाती देश इराण मध्ये थेट धुळ्याची केळी निर्यात झाली असल्याने पंचक्रोशीत त्यांचा हा प्रयोग गाजत आहे.
त्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत केळी लागवडीचा प्रयोग केला असून 12 टन एवढे उत्पादन पहिल्या खेपेत लाभले आणि याची थेट निर्यात निर्यातदारांच्या माध्यमातून इराणला झाली. विशेष म्हणजे तीन हजार 31 रुपये प्रति क्विंटल दराने त्यांच्या केळीला भाव मिळाला आहे. निश्चितच सत्यपाल यांनी नोकरी सांभाळत शेतीमध्ये मिळवलेलं हे यश इतरांसाठी प्रेरक राहणार आहे.
मानलं रामचंद्र बुवा ! 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवलेत 7 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा