Sujay Vikhe News : भारतीय जनता पक्षाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 20 अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. दरम्यान पक्षाने उमेदवारी बहाल केल्यानंतर आज सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. यासाठी त्यांनी जाहीर माफीनामा पक्षाच्या मेळाव्यात सादर केला असून आज दिवसभर याच माफीनाम्याची चर्चा पाहायला मिळाली आहे.
खरेतर, डॉक्टर सुजय विखे पाटील हे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपामध्ये आले होते. त्यांचे भाजपामध्ये येण्याचे निमित्त होते लोकसभा उमेदवारी. विशेष म्हणजे ते ज्या निमित्ताने भाजपामध्ये आलेत ते निमित्त देखील त्यांनी साध्य केलं. 2019 मध्ये त्यांना भाजपाने तिकीट दिले आणि ते निवडूनही आलेत. सुजय विखे यांची भाजपामध्ये इंट्री झाली, यानंतर त्यांचे वडील अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपावासी झाले. पण, या दोन्ही पिता-पुत्रांची भाजपामध्ये झालेली एन्ट्री भाजपाची डोकेदुखी वाढवणारी ठरली.
कारण की त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात मोठा फटका सहन करावा लागला. विखे पिता-पुत्र यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपाला फटका बसला असा आरोप भाजपामधीलच काही नेत्यांनी केला. पराभूत झालेल्या उमेदवारांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची तक्रारही केली होती. मात्र या तक्रारीनंतर विखे पिता पुत्रांचे पक्षात वजन आणखी वाढले. पण, सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात आल्यामुळे भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मने दुखावली गेलीत.
भाजपामधील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा वाद यामुळे चव्हाट्यावर आला. आजही भाजपाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुजय विखे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अंतर ठेवून आहेत. भाजपामधील काही लोकांनी दिल्ली दरबारी विखे पिता-पुत्रांचे वाढत असलेले वजन पाहता त्यांच्याशी सुत जुळवून घेतले आहे. मात्र आजही नगर भाजपामध्ये असे काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आहेत जे की विखे पिता-पुत्रांचा उघड-उघड विरोध करतात.
यामध्ये विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांचाही समावेश होतो. विखे यांच्या कार्यपद्धतीवर आजही भाजपामधील जुन्या लोकांच्या माध्यमातून विरोध होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना उमेदवारी देण्यापेक्षा पक्षाने दुसऱ्या निष्ठावंत उमेदवाराला संधी दिली पाहिजे, असे मत पक्षातील काही जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केले होते. आमदार राम शिंदे यांनी तर नगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा लढवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली होती.
मात्र भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने पुन्हा एकदा सुजय विखे यांच्या हातात नगर दक्षिणचा गढ सोपवला आहे. अशातच, आज सुजय विखे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर जाहीर माफीनामाच सादर केला आहे. भाजपा अंतर्गत सुजय विखे यांचा विरोध होत असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे यांच्या या माफीनाम्याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, आता आपण विखे यांनी आपल्या माफीनाम्यात नेमके काय म्हटले आहे हे थोडक्यात समजून घेऊया.
काय म्हटलेत सुजय विखे
सुजय विखे यांना भाजपा पक्ष श्रेष्ठीने उमेदवारी बहाल केल्यानंतर आज अर्थातच 18 मार्च 2024 ला प्रथमच भाजपचा नगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला आहे. संघटन महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती विखे यांच्या माफीनाम्याची. माफीनामा सादर करताना विखे म्हणालेत की, ‘पाच वर्षांचा कार्यकाल खडतर होता.
या कार्यकाळात आपण सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कुणी दुखावले गेले असतील तर त्यांची मी माफी मागतो. प्रत्येकाची कार्यपद्धत वेगळी असते. माझा स्वभाव स्पष्ट बोलणार आहे. केवळ आश्वासन देऊन मी कोणाला झुलवत ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. ही कार्यपद्धत, माझा स्वभाव कोणाला पटत नाही, कोणाला पटतो. परंतु अनावधानाने मी, माझा परिवार, आई-वडील, मुलांना स्मरून माफी मागतो. मी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला. काही वेळा तो झाला, काही वेळा नाही, कालांतराने होईल.
परंतु आता हे सर्व मागे ठेवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते, माझ्यापेक्षा गुणांनी श्रेष्ठ होते, त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत माझी उमेदवारी स्वीकारली आहे. याला कारण केवळ एकच आहे, मोदींना पंतप्रधान करायचे आहे. परंतु माझ्या कार्यपद्धतीचा दृष्टिकोन कधीही कोणाला खाली पाहण्यास लावण्याच्या उद्देशाने नव्हता. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचा फायदा कार्यकर्त्यांना मिळावा अन मिळाला पाहिजे, ही अपेक्षा चूकीची नाही.
परंतु आता उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चा करू नये. समाज माध्यमांचा वापर बंद करावा,’ असे यावेळी सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, प्रदेश महामंत्री विजय चौधरी ‘क्षमा वीरशः भूषणम’ असे म्हणतात यामुळे मोठ्या मनाने कार्यकर्ते विखे यांना माफ करतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध महागात पडू नये यासाठी सुजय विखे यांच्या या जाहीर माफीनाम्याकडे पाहिले जात आहे.