स्पेशल

जिल्ह्यात सत्तेचा माज…; बाळासाहेब थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया चर्चेत !

Sujay Vikhe Patil News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून तब्बल आठ वेळा निवडून आले होते. पण यावेळी थोरात यांचा अगदीच करेक्ट कार्यक्रम झालाय. ज्या माणसाने संगमनेरचे तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व केले, जो माणूस सीएम पदाचा कॅंडिडेट होता, जो माणूस महाविकास आघाडीचा स्टार प्रचारक होता त्या माणसाला आज आपली सीट वाचवता आली नाही.

यामुळे या धक्कादायक निकालाची सध्या संपूर्ण राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांना शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी आसमान दाखवले असले तरी या पराभवामागे विखे पाटील यांची भूमिका मोठी आहे यात शंकाच नाही. खरंतर, लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांनी पराभव केला होता.

नगर दक्षिणेतील हा निकाल देखील खूपच अनपेक्षित होता. दरम्यान याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पिता पुत्र गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करत होते. निवडणुकीच्या सुरुवातीला तर सुजय विखे पाटील हेच संगमनेर मधून निवडणूक लढवणार असे बोलले जात होते.

मात्र ऐनवेळी या जागेवर शिंदे गटाचे अमोल खताळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आणि आजअखेर अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना चितपट केले आहे. खताळ आज खऱ्या अर्थाने एक मोठे जायंट किलर ठरले आहेत. दरम्यान, याच निकालावर भाष्य करताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

खताळ यांनी विजय मिळवल्यानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे संगमनेर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. चाळीस वर्ष निर्विवादित वर्चस्व असणाऱ्या थोरात यांचे आव्हान खताळ यांनी यशस्वीरीत्या पेलून आज एक नवीन इतिहास घडवला आहे.

याच निकालाबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, ‘अमोल खताळच्या माध्यमातून आम्ही जे शब्द दिले ते आता पूर्ण करणारच. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरच्या जनतेने सर्वात मोठी भेट दिली. बाळासाहेब थोरात हवेत होते.

मात्र अमोल खताळच्या रूपाने संगमनेरच्या विकासाचा नवीन सूर्य उगवला आहे, असं म्हणत थोरातांवर निशाणा साधला. पुढे बोलताना डॉ. विखे यांनी, ‘मी लोकसभा पराभवाचा बदला घेतला नाही. पण कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला माहीत नाही. मात्र संगमनेरमध्ये आम्ही गनिमी काव्याने विजय मिळवला आहे.

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्याला सामान्य माणसाने पराभूत केले. थोरातांनीच दहशत से आजादी ही टॅगलाईन शोधून काढली. मात्र लोकांनी त्यांनाच आझाद करून टाकलं,’ असं म्हणतं थोरात यांना टोमणा लगावला. तसेच त्यांनी सरकार स्थापन होताच संगमनेरचा पाणी प्रश्न सोडवणार, असे आश्वासन देखील दिले आहे.

थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम !

सुजय विखे म्हणतात की, ‘संगमनेरचा विजय हा गोरगरीब जनतेचा आहे. इथल्या लोकांना ४० वर्षांपासून न्यायाची अपेक्षा होती, पण ती यावेळी पूर्ण झाली. अमोल खताळ एकटे आमदार नाही, तर त्याच्यासोबत उभा असणारा प्रत्येकजण आमदार आहे. जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा आम्ही कार्यक्रम लावलाय.

खरंतर, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिले जात होते त्या व्यक्तीला निवडणुकीत पराभवाची धूळ चारणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. म्हणून राजकीय वर्तुळात देखील विखे पाटील यांनी थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts