Sujay Vikhe Patil News : आज रविवारी, दिनांक पाच जानेवारी 2025 रोजी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेचे यंदाचे 24 वे वर्ष. या 24 व्या वर्षाच्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना स्पीकर म्हणून बोलवण्यात आले. यावेळी सुजय विखे पाटील यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला.
यावेळी माजी खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अशा अनेक रंजक गोष्टी सांगितल्यात ज्या आजपर्यंत त्यांनी कुणासोबतच शेअर केलेल्या नव्हत्या. यावेळी त्यांनी ते बूट आणि घड्याळ का घालत नाहीत? त्यांनी बूट आणि घड्याळ घालणं का बंद केलंयं? याचाही किस्सा सांगितला. ते म्हणालेत की, मला पूर्वी चांगल्या कपड्यांची, बूट, घड्याळ, गाड्यांची फार आवड होती.
पण जेव्हा मी PMT ला ऍडमिशन घेतल्यानंतर मी जेव्हा पहिल्या दिवशी ओपीडीला बसलो होतो तेव्हा एक वयस्कर बाबा आलेत. टोपी, फाटलेलं धोतर, पूर्ण मळके कपडे, तुटलेल्या चपल्या घालून तो बाबा तिथं आला. त्याचा मुलगा माझ्या युनिटमध्ये ऍडमिट होता. पण त्याच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी पैसेच नव्हते.
त्या माणसाकडे पाहून त्या दिवसापासून ते आजपर्यंत ना मी कधी घड्याळ घातलं, ना मी कधी बूट घातलेत. म्हणजे माझा मोह, माझ्या पैशांचा हेवा, माझ्या पैशांची गरज त्या एका म्हाताऱ्याने संपवून टाकली. कारण याला जर खाण्यासाठी पैसे नसतील तर मला हे सगळं कशाला हवं.
ते इतकं माझ्या मनाला लागलं की त्या दिवसापासून मी सगळा विषय सोडून दिला. आणि म्हणून आज मी जसा दिसतो त्या एका कारणांमुळे. गरीबी काय असते, गरिबांचे दुःख दूर करण्यासाठी पद्मश्री आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी काय केलं? मी नेहमी आजोबांना विचारायचो तुम्ही इतके साधे का राहतात? तेव्हा ते म्हणायचे की तुला याचे कधी ना कधी तरी उत्तर मिळणारच आहे.
अन त्या PMT च्या ओपीडीमध्ये पहिल्या दिवशी मला माझ्या एका वयस्कर पेशंटने ते उत्तर दिलं. त्यादिवशी माझ जीवन पूर्णपणे बदललं आणि मी कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा राहायला लागलो आणि मी यशस्वी झालो.
कारण मग मला पैशांचा हेवा राहिला नाही. म्हणून तुम्हाला पैशांचा हेवा राहिला नाही तर तुम्ही मोठे होऊ शकता अन्यथा नाही. पैसे गरजेचे आहेत पण किती याला मर्यादा आहेत, असं म्हणतं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांना यावेळी उजाळा दिला.