स्पेशल

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतो ! सुजय विखेंच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध, म्हणाले अडचण असेल तर…

Sujay Vikhe Patil News : राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, नगर दक्षिणचे माजी खासदार भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी साईनगरी शिर्डीत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणाबद्दल एक विधान केले होते आणि त्यानंतर सगळीकडे या विधानाची चर्चा आहे आणि त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली जात आहे.

आता महायुतीमध्ये समाविष्ट असणारा शिवसेना शिंदे गट देखील याप्रकरणी आक्रमक झाला आहे. म्हणून सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात असे चित्र आहे. मंडळी, शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करावे.

त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. यातून वाचलेला पैसा मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी खर्च करावा, अशी एक सूचना सुजय विखे यांनी केली. या मागणीसाठी आपण ग्रामस्थांना सोबत घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

खरेतर, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य शिर्डी संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळासंबंधी बोलतांना केले. ते म्हणालेत की, शिर्डी संस्थानतर्फे मोफत जेवण दिले जाते. अख्खा देश येथे येऊन मोफत जेवण करतो. आता महाराष्ट्रातील भिकारीही येथे जमा झाले आहेत.

शिर्डीला येणाऱ्यांना २५ रुपये देऊन जेवण करणे परवडणारे आहे. म्हणून त्यानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घ्यावा. वाचलेला हा पैसा शिक्षणासाठी खर्च करावा. या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या भविष्याची तयारी करून घेता आली पाहिजे. केवळ शाळांच्या इमारती चांगल्या बांधून जमणार नाही.

तेथे चांगले शिक्षक आणण्यासाठी खर्च करा. इंग्रजीचे शिक्षक जर मराठीतून इंग्रजी विषय शिकवित असतील तर काय उपयोग? जे पैसे अन्नदानासाठी खर्च होतात ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. तुम्ही निर्णय घ्या, कोणी या विरोधात आंदोलन केले तर त्यांचे काय करायचे ते पाहू असे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

एवढेच नाही तर त्यांनी याबाबत बोलताना आपण लवकरच यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेऊ, असे सुद्धा उपस्थित मंडळीला सांगितले अन त्यांच्या भाषणाला उपस्थित अनेकांनी त्यांच्या या सूचनेचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्यात. पण आता या विरोधात काही लोक आक्रमक झाले आहेत.

सुजय विखे पाटील यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिंदे गटाने देखील सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. शिंदे गटाचे धर्मवीर अध्यात्मिक सेनेने सुजय विखे पाटील यांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले असून या वक्तव्याचा निषेध केला आहे.

धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी याप्रकरणी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणालेत की आम्ही सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. येथे शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. भाविकांना मोफत प्रसाद वाटपास विरोध करणे आणि त्यांना भिकारी म्हणने फारच दुर्दैवी आहे.

दरम्यान माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी विरोधकांना आयते कोलीत दिलेले दिसते. यामुळे आगामी काळात त्यांच्यावर विरोधकांच्या माध्यमातून जोरदार पलटवार होणारच आहे. म्हणून आता आपल्या या वक्तव्यावर सुजय विखे काय स्पष्टीकरण देतात हे पाहण्यासारखे ठरेल.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts