Land Acquisition:- महाराष्ट्रमध्ये अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून त्याकरिता आवश्यक प्रक्रिया देखील वेगात पूर्ण केल्या जात आहेत. अगदी याच प्रकल्पांमधला महत्त्वाचा आणि भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून साकारला जाणारा सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारला जाणार आहे. साधारणपणे हा महाराष्ट्रातील नाशिक तसेच अहमदनगर, धाराशिव आणि सोलापूर या चार प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे.
सध्या या महामार्गाच्या कामाची प्रगती पाहिली तर त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून रेखांकन देखील करण्यात आलेले आहे. तसेच महामार्गाकरिता जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांना हरकती घेण्याकरिता प्रसिद्धी देखील देण्यात आली असून त्यानुसार सुनावणी होऊन त्यांच्या समाधान करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होता. परंतु अजून देखील या एक्सप्रेसच्या कामाला गती मिळत नसून भूसंपादन प्रक्रियेच्या विरोधात काही ठिकाणी शेतकऱ्यांचा याला विरोध होत आहे.
या पार्श्वभूमीवर भूसंपादन प्रक्रियेला वेग यावा याकरिता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार व तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आढावा बैठक देखील घेतली होती व या माध्यमातून भूसंपादन विभागाला भूसंपादन प्रक्रिया ताबडतोब राबवण्याच्या सूचना केलेल्या होत्या. परंतु अजून देखील नाशिक जिल्ह्यातील जमिनींचे मूल्यांकन झालेले नसल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही.
भूसंपादन रखडण्यामागील प्रमुख कारणे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरत ते चेन्नईदरम्यान ग्रीनफिल्ड महामार्ग उभारला जाणारा असून तो राज्यातील नासिक, अहमदनगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे. परंतु अजून देखील या महामार्गाच्या कामाला वेग आला नसल्याचे चित्र आहे. या महामार्गाकरिता सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी मिळणारा मोबदला हा समाधानकारक न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील आंदोलनाची ठिणगी पडू नये याकरिता नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड तसेच सिन्नर तालुक्यामधील भूसंपादनाकरिता जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जात नसल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.
परंतु या माध्यमातून बागायती जमिनींकरिता जे काही मूल्यांकन करण्यात आले ते कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे मूल्यांकन वाढवण्यात यावे या मागणी करिता दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन सुरू केले आहे व त्याचाच परिणाम हा नाशिक जिल्ह्यातील जमिनीच्या भूसंपादनावर देखील दिसून येत असल्याचे चित्र आहे. परंतु या दरम्यान रामशेज तसेच पिंपळणारे या दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये नोटीसा बजावण्यासाठी जमिनी मोजण्याचे काम देखील सुरू आहे.
सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचे स्वरूप
हा एक्सप्रेस वे खूप महत्त्वाचा असून नासिक आणि सुरत या दोन शहरा दरम्यानचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि 70 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 195 हेक्टर जमिनीचे संपादन याकरिता होणार असून जिल्ह्यातील 122 किलोमीटरच्या अंतर या महामार्गाचे असणार आहे. हा सहा लेनचा महामार्ग असून यावर पाच मीटरचे दुभाजक आहेत.
तसेच महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यात हा 26 किलोमीटर अंतर वनक्षेत्रातून पार करणार आहे. या महामार्गावर सुरगाणा तालुक्यातील संबरकल या ठिकाणी 1.35 किलोमीटरचा बोगदा देखील असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सिन्नर तालुक्यात वावी या ठिकाणी समृद्धी महामार्गाची हा महामार्ग कनेक्ट होणार आहे. परंतु आता भूसंपादनाच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्यामुळे हा महामार्गाला कधी गती येईल हे आता येणारा काळच ठरवेल.