Marathi News : सूर्यावर मागील सहा वर्षांतील सर्वात मोठा स्फोट झाला असून त्यामुळे या ग्रहावरील घडामोडी शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर २०१७ पासून सूर्यामध्ये झालेला हा सर्वात मोठा स्फोट मानला जातो.
गुरुवारी ३५१४ नावाच्या सनस्पॉटमधून २.८ श्रेणीचा उद्रेक झाला असून एक मोठे सौर वादळ येत्या एक-दोन दिवसांत आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवरही परिणाम करण्याची भीती अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने यापूर्वीच सूर्य त्याच्या ११ वर्षांच्या सौर चक्रातून जात असल्याने खूपच सक्रिय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) आणि सोलर फ्लेअरसारख्या घटना घडत असून ही प्रक्रिया २०२५ पर्यंत चालू राहण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
या सोलर फ्लेअरमुळे पृथ्वीवर भू-चुंबकीय वादळे येण्याची शक्यता असून त्याची तीव्रता रविवारी सर्वाधिक असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे. कोरोनल मास इंजेक्शन किंवा सीएमई हे सौर प्लाझ्माचे मोठे ढग असून सौर स्फोटानंतर हे ढग सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील अवकाशात पसरतात.
अंतराळातील त्यांच्या परिभ्रमणामुळे ते विस्तारत जाऊन बऱ्याचदा अनेक लाख मैलांचे अंतर गाठतात. अनेक वेळा ते ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्रालाही धडकतात. जेव्हा त्यांची दिशा पृथ्वीकडे असते, तेव्हा ते भू-चुंबकीय अडथळे आणू शकतात.
त्यामुळे उपग्रहांमध्ये शॉर्टसर्किट होऊ शकते आणि पॉवर ग्रीडवरही परिणाम होऊ शकतो. त्यांचा प्रभाव अधिक असेल तर ते पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळवीरांनाही धोका पोहोचवतील, अशी भीती व्यक्त करतानाच याचा परिणाम अमेरिकेतील एका शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआऊटच्या माध्यमातून समोर आल्याचेही शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.