Marathi News : काळाच्या ओघात मामाचा गाव हरवला असून, ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे बालगीतही आता इतिहासजमा झाले आहे.
पूर्वी शाळेला सुट्टया लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात आजोळी जायची ओढ लागत असे; परंतु बदलत्या काळात काटकसरीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने मामाची गावे परकी झाली आहेत.
उन्हाळ्यात घरात बसून अथवा मैदानात खेळले जाणारे पारंपारिक खेळ आज खेळले जात नाहीत. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टया लागताच घरा-घरात अडगळीत पडलेले बुद्धीबळाचे पट, कॅरम बोर्ड बाहेर निघत असत; परंतु बदलता काळ संगणक व व्हिडीओ गेमचाच बोलबाला अधिक आहे.
काळाच्या ओघात पारंपारिक खेळ आता इतिहासजमा झाले. जुने खेळ लोप पाऊन नवीन नवीन खेळ पुढे येत असले तरी आजही आपल्या नातवाने उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जावे, अशी बहुतांश आजीची इच्छा आहे; परंतु अलिकडील काळात पण भाच्यांच्या कुठेतरी सीमा येत असल्याचे चित्र समोर येत आहे.
ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्टयांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही. पूर्वी परीक्षा संपल्या की मुलांना मामाच्या गावी जाण्याचे वेध लागायचे. त्यावेळी नात्यागोत्यांमध्ये एकमेकांविषयी ऐकभाव होता परस्परांत स्नेह व आपुलकी होती.
तेव्हा मामाचा गाव हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. खूप लांब नाही तर जवळच्याच एखाद्या खेडेगावात मामाचे घर असे, दिवसभर विविध खेळ खेळल्यानंतर दुपारी विहिरीत किंवा तलावामध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर सायंकाळी अंगणात सर्वांसह बसून इकडच्या तिकडच्या गप्पा व नंतर चंद्राच्या शितल चांदण्यात जेवणाची पंगत असे.
सोबत आजीने दिवसभर जपून ठेवलेला खाऊ अमृताची गोडी देत असे. या वेळापत्रकात सुटी कधी संपली हे कळूनही येत नसे. नव्या आधुनिक युगात हे सारे संदर्भ आता पुसल्यागत झाले आहेत. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानामुळे जीवन शैली बदलली आहे.
नात्यागोत्यांतील स्नेहभाव कायम असला तरी तो प्रकट करायला वेळ नाही. शहरांसह खेडेगावातील कौटुंबिक व सामाजिक स्थिती बदलली आहे. बहुतेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावी होस्टेलला आहेत. सुटी लागल्यावर त्यांना आपल्याच घरी थांबायचे असते.
युवकवर्ग सोशल मिडिया, या माध्यमाद्वारे आपल्या जीवनाचा आनंद शोधत आहेत. माणसांमाणसांत संवादच राहिलेला नाही. सर्व नातेवाईकांशी ऑनलाईन संपर्क झाल्यामुळे नात्यातील दुरावा कमी होत आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येणारे मामाचे गाव ही संकल्पना, या आधुनिक युगात कालबाह्य होताना दिसत आहे