Pune-Nashik Semi High-Speed Railway:- गेले कित्येक दिवसापासून चर्चेत असलेला पुणे- नासिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला काही मुहूर्त मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले
नाशिक व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा रेल्वेमार्ग विविध कारणांनी रखडला जात असून या रेल्वे मार्गाच्या कामाला पुन्हा कधी सुरुवात होणार हा एक मोठा प्रश्न आहे.
त्यातच आता या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग पूर्ण होण्याकरिता आणखी काही वर्ष वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
पुणे- नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून नाकारण्यात आली परवानगी
याबाबत सविस्तर वृत्त असे की,जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मोटोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप अर्थात जीएमआरटी दुर्बिणीवर पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे प्रस्तावित रेल्वे मार्गाला आता रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे आता हा रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार असुन या मार्गाचा आता नव्याने डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात डीपीआर बनवला जाणार असल्याची माहिती खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेमध्ये दिली.
रेल्वे मंत्रालय आणि महारेल यांच्यावतीने पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू होते व त्या संदर्भातील आराखडा तयार करून मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड व पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर फक्त त्याला आता अंतिम मंजूरी येणे तेवढे बाकी होते. परंतु या सगळ्यांमध्ये काही त्रुटी होत्या.
पुणे आणि नासिक शहराला जोडण्याकरिता महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेल, महाराष्ट्र सरकारची संयुक्त उपक्रम कंपनी आणि रेल्वे मंत्रालय यांनी डीपीआर तयार केला. या डीपीआर नुसार हा प्रस्तावित मार्ग नारायणगाव मधून जात होता व त्या ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲट्रोफिजिक्स यांनी जीएमआरटी वेधशाळा स्थापित केली आहे.
या वेधशाळेतील सेवा सुमारे जगातील 31 देशातील वैज्ञानिक निरीक्षणासाठी वापरतात. या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गाचा या वेधशाळेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो व हा मार्ग करताना अनेक अडचणी येणार आहे.
त्यामुळे आता रेल्वेने येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरिता डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले व त्यामुळे या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेले नाही.
या तीन रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
तसेच यामध्ये नासिक, साईनगर शिर्डी(82 किलोमीटर ), पुणे ते अहिल्यानगर( 125 किलोमीटर) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग आणि साईनगर शिर्डी ते पुणतांबा( 17 किमी) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षण मंजूर करण्यात आले आहे व हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर या मार्गाचा डीपीआर तयार केला जाणार आहे.
इतकेच नाहीतर पुणे ते नाशिक दरम्यानची जी काही रेल्वे दळणवळण यंत्रणा आहे ती सुधारण्याकरिता २४८ किलोमीटर लांबीच्या दौंड ते मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे व त्यापैकी 178 किलोमीटरचे काम यापूर्वी सुरू करण्यात आले आहे.