स्पेशल

निवृत्तीनंतर धरली शेतीची कास! बोबडे दाम्पत्याने केली ड्रॅगन फ्रुटची लागवड आणि एकरात मिळेल 3 लाखाचे उत्पन्न, वाचा नियोजन

सेवानिवृत्ती हा आयुष्यातील असा काळ असतो की अगदी आपल्याला कळायला लागते किंवा जेव्हा आपण शिक्षण संपवून कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतो तेव्हापासून व्यक्ती अनेक प्रकारचे कष्ट करतो आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. परंतु ठराविक कालावधीनंतर हे सगळ्या जबाबदारीच्या ओझ्यातून मुक्त होऊन राहिलेल्या आयुष्याचे दिवस मस्त आरामात घालवण्याचे दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचे दिवस होय.

परंतु आपल्याला बरेच व्यक्ती समाजामध्ये असे दिसून येतात की ते सेवानिवृत्ती झाल्यानंतर देखील कुठल्यातरी व्यवसायामध्ये पडतात आणि तिथे देखील यश संपादन करतात. कारण असा व्यक्तींचा पिंड मुळातच हा कष्ट करण्याचा व घरी रिकाम न बसण्यापेक्षा काहीतरी केलेले बरे अशा पद्धतीचा असतो व हे व्यक्ती स्वस्थ बसतच नाहीत.

बहुतांशी शेतकरी कुटुंबातील जे काही व्यक्ती असतात ते सेवानिवृत्तीनंतर शेतामध्ये काम करतात व शेती देखील उत्तम प्रकारे करताना दिसून येतात. याच मुद्द्याला धरून जर आपण  राजापूर तालुक्यातील यशवंत बोबडे व उज्वला बोबडे यांचे उदाहरण पाहिले तर यांनी सेवानिवृत्तीनंतर पडीक जमिनीवर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली व लाखोंचा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.

 बोबडे दांपत्याने केली ड्रॅगन फ्रुटची लागवड

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातून अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले यशवंत बोबडे व मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी उज्वला बोबडे या दांपत्याने सेवानिवृत्तीनंतर रिकामे बसण्यापेक्षा शेती करण्याचा निर्णय घेतला व पडीक जमिनीवर ड्रॅगन फ्रुटचा मळा फुलवलेला आहे. ड्रॅगन फ्रुट व्यतिरिक्त त्यांनी तांबड्या मातीमध्ये ड्रॅगन फ्रुट सोबत आंबा, काजू तसेच जांभूळ व नारळ, अननस सारख्या इतर फळबागा देखील फुलवले असून 70 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी फळबागाची नियोजन केलेले आहे.

 पडीक जमिनीवर केली अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची लागवड

जेव्हा त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे निश्चित केले तेव्हा त्यांनी पडीक जमिनीचा व्यवस्थित कौशल्याने उपयोग केला व लागवडीकरिता अडीच फूट उंचीचे दगडी बांधांवर सहा फूट उंचीचे सिमेंटचे खांब उभे केले व त्या खांबांवर लोखंडी रिंग बसवल्या. खांब्याचे काम झाल्यानंतर सरी पद्धतीने ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली. सऱ्या पाडताना दोन सरींमध्ये दहा बाय आठ इतके अंतर ठेवले व पंढरपूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ड्रॅगन फ्रुटचे रोपे आणून त्याची लागवड केली. या अंतरावर लागवड करण्यासाठी त्यांना एका एकरला 1600 रोपे लागली.

 अशा पद्धतीने केले आहे पाण्याचे नियोजन

पडीक जमिनीवर ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी त्या पिकाला व्यवस्थापन करणे गरजेचे होते व त्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे. त्यामुळे योग्य वेळेला योग्य तितका पाण्याचा पुरवठा झाडांना करणे शक्य झाले आहे. पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता त्यांनी या पडीक जमिनीवर 14 फूट खोल विहीर खोदली असून यामध्ये त्यांना 14 फुटावर चांगले पाणी उपलब्ध झाले असल्याने पाण्याची सोय उत्तम पद्धतीने आहे. तसेच विजेमध्ये बचत व्हावी म्हणून त्यांनी सोलर पॅनल बसवला असून सोलर पॅनल च्या माध्यमातून इलेक्ट्रिक पंप बसवलेला आहे.

 खतावरील खर्च अशा पद्धतीने वाचवला

दुसरे महत्त्वाचे म्हणजे ड्रॅगन फ्रुटसाठी जे काही खतांची आवश्यकता होती ते कंपोस्ट खत त्यांनी बाजारातून न आणता बागेमध्ये तयार केले. त्यासाठी काडी कचरा तसेच पालापाचोळा व इतर काही पदार्थांचा उपयोग केला व 40 दिवसांमध्ये खताची निर्मिती केली. आणि बागेमध्येच खत निर्मितीचा युनिट  उभारला असून यामध्ये 50 किलोच्या दीडशे बॅगा खतनिर्मिती एकावेळी करणे त्यांना शक्य झाले आहे.

 अशा पद्धतीने ठेवतात बागेचे व्यवस्थापन

फळबागेची निगा ठेवण्यापासून तर खत व पाण्याचे नियोजन इत्यादीपासून तर फळांची काढणी मजुरांकरवी करून घेणे इत्यादी कामे उतार वयात देखील हे दांपत्य खूप उत्साहाने करतात. एवढेच नाही तर बाजारपेठेचा शोध घेणे व मालाची विक्री करणे ही जबाबदारी त्यांचा मुलगा व सून सांभाळतात.

ड्रॅगन फ्रुटची विक्री ते जळगाव व लातूर इत्यादी भागांमध्ये जशी मागणी आहे त्याप्रमाणे करतात. ड्रॅगन फ्रुट च्या रोपांची काळजी घेणे खूप गरजेचे असते व त्या दृष्टिकोनातून रोपांच्या ज्या काही फांद्या आहेत त्यांच्या टोकाचा भाग कुजायला लागला तर झाडाच्या वाढीवर खूप विपरीत परिणाम होतो त्यामुळे नियमित निरीक्षण करून खराब झालेला भाग छाटून काढणे खूप गरजेचे असते.

तसेच इतर वन्य प्राण्यांपासून रोप फळांचे नुकसान देखील होत नाही. ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर एका वर्षात उत्पन्न सुरू होते. परंतु या दांपत्याने व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळे एक वर्ष ऐवजी केवळ आठ महिन्यांमध्ये ड्रॅगन फ्रुटला फळधारणा झाली असून एका एकरात तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

 यापद्धतीने माणसाचे वय कितीही असले परंतु जर मनामध्ये उत्साह आणि जिद्द असेल तर माणूस कुठल्याही वयात कितीही अशक्य काम शक्य करून दाखवू शकतो हे बोबडे दांपत्याच्या कामगिरीवरून दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts