काही वर्षं अगोदर साधारणपणे स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर यामध्ये असे समजले जायचे की शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. परंतु या मताला खोटं ठरवत गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी असो की यूपीएससी या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकू लागले असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील मागे टाकत उत्तुंग यश संपादन करताना दिसून येत आहे.
एवढेच नाही तर त्यातील अनेक तरुण आणि तरुणी या शेतकरी कुटुंबातील असून अखंड मेहनत आणि अभ्यासातील सातत्य या जोरावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करताना दिसून येत आहेत.कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु त्या प्रयत्नांना व्यवस्थित दिशा असणे देखील तितकेच गरजेचे असते.
दिशाहीन प्रयत्न करून देखील फायदा होत नसतो. परंतु अनेक ग्रामीण भागातील आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलं देखील आता योग्य दिशेने प्रचंड प्रमाणात अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना गवसणी घालत आहेत. याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
शेतकरी कुटुंबातील आरती दहीतुले बनल्या मंत्रालयात कर सहाय्यक अधिकारी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गंगापूर तालुक्यातील कायगाव या ठिकाणाच्या शेतकरी कुटुंबातील आरती जालिंदर दहीतुले यांनी अथक मेहनत, मनात प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये कर सहाय्यक अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.
त्यामुळे परिसरामध्ये आरती यांचे कौतुक होताना दिसून येत आहे. जर त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशनचे शिक्षण घेतले असून ते सध्या टीसीएस या नामांकित कंपनीमध्ये पुण्यात नोकरीला आहेत. पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत टोग वस्ती जुने कायगाव या ठिकाणी त्यांनी घेतले आहे.
त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम या ठिकाणाच्या सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणाकरिता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पॉलिटेक्निक डिप्लोमा, डिग्री कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनायचे निश्चित केले व त्या अनुषंगाने तयारी सुरू केली.
अहोरात्र अभ्यास केला व त्याचे फळ त्यांना आता मिळाले. या अभ्यासाच्या बळावर त्यांनी एमपीएससीची प्रिलिम्स अर्थात पूर्व आणि मेन एक्झाम म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत मंत्रालयामध्ये कर सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. अशा पद्धतीने जिद्दीने आणि कष्टाने जर कुठली गोष्ट मिळवायची ठरवली तर ती मिळतेच हे सिद्ध होते.