अनेक तरुण आणि तरुणी एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. बऱ्याच जणांचे स्वप्न असते की यूपीएससीच्या माध्यमातून आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होणे. परंतु या परीक्षा पास करणे म्हणजे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. प्रचंड प्रमाणात नियोजनबद्ध अभ्यास, जिद्द, मुलाखतीची व्यवस्थित तयारी आणि प्रचंड प्रमाणात असलेल्या स्पर्धेला तोंड देत यश मिळवायचे असते.
आयएएस आणि आयपीएस हे दोन्ही पदे भारतातील पोलीस आणि प्रशासकीय सेवेतील महत्त्वपूर्ण अशी पदे आहेत. परंतु बऱ्याच जणांची यामध्ये गल्लत उडते. या दोन्ही पदांमध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फरक असून त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सुविधा आणि पगार इत्यादीमध्ये देखील बराच फरक आहे. त्यामुळे या लेखात या दोन्ही पदांविषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
आयएएस म्हणजे नेमके काय?
आयएएस म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस हा त्याचा फुल फॉर्म असून या पदासाठी यूपीएससीची परीक्षा पास होणे गरजेचे असते. आयएएस पोस्ट प्राप्त केल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश मिळतो. आयएस साठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही अनेक प्रकारचे मंत्रालय तसेच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी होत असते.
आयपीएस म्हणजे नेमके काय?
आयपीएस म्हणजेच इंडियन पोलीस सर्विस होय. आयपीएस च्या माध्यमातून पोलीस दलातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. आयपीएस झाल्यानंतर डीजीपी, इंटेलिजन्स ब्युरो तसेच सीबीआय चीफ इत्यादी महत्त्वाच्या पदांना देखील आपण गवसणी घालू शकतो. याकरता देखील यूपीएससी परीक्षा देणे गरजेचे असते.
या दोन्ही पदांमध्ये काय आहे फरक?
जर आयएएस आणि आयपीएस या दोन्ही पदातील फरकाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे आयएएस अधिकारी कायम फॉर्मल ड्रेस कोड मध्ये असतात. त्या उलट आयपीएस अधिकाऱ्यांना ड्युटी कालावधीमध्ये वर्दीत असणे आवश्यक असते. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे आयएएस अधिकारी त्यांच्यासोबत एक किंवा दोन बॉडीगार्ड ठेवू शकतात. परंतु त्या तुलनेत आयपीएस अधिकाऱ्यांसोबत पूर्ण पोलीस फोर्स असते. तिसरा फरक म्हणजे आयएएस अधिकाऱ्याला मेडल देऊन सन्मानित करण्यात येते. तर एका आयपीएस अधिकाऱ्याला स्कॉर्ड ऑफ ऑनर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते.
कार्यक्षेत्रामध्ये असलेला फरक
जर आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामाचा विचार केला तर आयएएस अधिकाऱ्याच्या खांद्यावर प्रशासन तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी इत्यादी महत्त्वाची जबाबदारी असते. तर आयपीएस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. या माध्यमातून समाजातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे एक महत्त्वाचे कर्तव्य असते.
किती असते पगार?
आयएएस आणि आयपीएस अधिकारी यांना मिळणाऱ्या पगाराचा विचार केला तर आयएएस अधिकाऱ्याच्या खांद्यावर अनेक प्रकारच्या जबाबदारी असतात. त्यांना अनेक सरकारी विभाग आणि अनेक मंत्रालयांमध्ये काम सांभाळावे लागते. त्या तुलनेत आयपीएस अधिकाऱ्याचा विचार केला तर त्यांच्या अखत्यारीत फक्त पोलीस विभाग येत असतो. या अनुषंगाने या दोघांचे काम आणि त्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादी डोळ्यासमोर ठेवून त्यांचे वेतन ठरवले जाते.
तसे पाहायला गेले तर दोघांच्या वेतनामध्ये जास्त फरक नाही. सातवा वेतन आयोगानंतर विचार केला तर आयएएस अधिकाऱ्याची वेतन 56 हजार 100 ते अडीच लाख रुपये प्रति महिना इतकी असून त्यासोबत अनेक प्रकारच्या सोयी सुविधा देखील दिल्या जातात. त्या तुलनेत एका आयपीएस अधिकाऱ्यांचे वेतन हे प्रतिमहिना 56 हजार 100 ते दोन लाख 25 हजार रुपये इतके असते. यांना देखील अनेक प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात.
आयएएस आणि आयपीएस यामध्ये कोण आहे जास्त प्रभावशाली?
जर आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर एका क्षेत्रासाठी एक आयएएस अधिकारी असतो तर एका क्षेत्रासाठी एकापेक्षा जास्त आयपीएस असतात. आयएएस हे उच्च दर्जाचे पद असून त्यांना कोणत्याही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या पदासाठी नियुक्त केले जाते तर त्या तुलनेत आयपीएस अधिकाऱ्याला एका जिल्ह्याचे एसपी बनवले जाते.
यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून होते निवड
आयएएस आणि आयपीएस या दोन्ही पदांसाठीची निवड ही यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. परंतु कमी जास्त रँक मिळाल्यामुळे काही उमेदवारांना आयएस आणि काही उमेदवारांना आयपीएस हे पद दिले जाते. यामध्ये आयएएस हे पद उच्च दर्जाचे असून आयएएस पदावर निवड झालेल्या उमेदवाराला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्त केले जाते. त्यामुळे बऱ्याचदा जिल्ह्यातील पोलीस विभाग आणि त्यासोबतच अन्य काही महत्त्वाच्या विभागांवर देखील जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्यामुळे आयएएस हे पद जास्त पावरफुल असते. आयपीएस या पदावर निवड झालेल्या अधिकाऱ्याला पोलीस विभागाचे काम पहावे लागते.