महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत विचार केला तर पर्यटन स्थळांच्या दृष्टीने समृद्ध असे राज्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुम्हाला जंगल सफारी करायची असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी फिरायची हौस असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत.
यामध्ये औरंगाबाद आणि पुणे हे दोन जिल्हे पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून अनेक डोंगर रांगा तसेच गडकिल्ले इतकेच नाही तर ऐतिहासिक दृष्टीने समृद्ध असलेले वारसा स्थळे देखील या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल तर तुम्ही पुणे जिल्ह्याची निवड करू शकता. या दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये पुणे जिल्ह्यात असणाऱ्या काही स्थळांची माहिती घेणार आहोत.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थळे
1- भीमाशंकर – भीमाशंकर हे अध्यात्मिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे असलेले ठिकाण असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर या ठिकाणी आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून या ठिकाणाला निसर्गाने देखील वरद हस्ताने दिलेले आहे. आध्यात्मिक वातावरणाव्यतिरिक्त या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हिरवीगार दाट झाडी तसेच जंगल असून भीमा शंकराचे मंदिर हे उंच डोंगराच्या कुशीमध्ये बांधण्यात आलेले आहे. भीमाशंकर या ठिकाणी पावसाळ्यात खूप नयन रम्य असे दृश्य असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये भीमाशंकर ला भेट देण्याचा प्लान करू शकता.
2- मुळशी डॅम– पुण्यापासून साधारणपणे 50 किलोमीटर अंतरावर मुळशी धरण असून हे मुळा नदीवर बांधण्यात आलेले आहे. तुम्हाला जर अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच मुळशी डॅमला भेट त्यांनी गरजेचे आहे. या ठिकाणी सगळ्या बाजूंनी असलेली हिरवीगार वनसंपदा तसेच थंड व शांत वातावरण मनाला खूप प्रसन्नता देऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी खूप पर्यटक येतात.
3- पवना लेक– पवना लेक हे ठिकाण पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. पवना लेक ला जायचे असेल तर लोणावळा येथून देखील जाता येते. पवना लेक ते लोणावळा हे अंतर साधारणपणे वीस किलोमीटर आहे. पवना सरोवर या ठिकाणी फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट सोबतच तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला कुटुंबासोबत किंवा तुमचा मित्र परिवारासोबत काही क्षण एन्जॉय करायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
4- पार्वती हिल्स– हे ठिकाण एक टेकडी असून ते पुणे शहराच्या जवळच आहे. पुण्यात गेल्यानंतर तुम्ही पार्वती हिल्सला भेट देणे गरजेचे आहे. या ठिकाणी अनेक निसर्ग समृद्ध असे दृश्य पाहायला मिळतात. पार्वती या ठिकाणी असलेले मंदिर पुरातन काळातील असून या मंदिराच्या चारही बाजूंनी निसर्गाने भरभरून दिलेली संपदा पाहायला मिळते. पार्वती टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक तसेच पेशवे संग्रहालय व या टेकडीच्या पायथ्याशी प्राचीन लेणी देखील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हे ठिकाण देखील खूप उत्तम आहे.
5- एम्प्रेस गार्डन– कुटुंब आणि मित्र परिवारासोबत जर तुम्हाला पिकनिक प्लान करायचे असेल तर पुण्यातील एम्प्रेस गार्डन हे ठिकाण खूप उत्तम आहे. तब्बल 39 एकर परिसरामध्ये हे गार्डन विस्तारलेले असून या गार्डनमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे फुले तसेच गार्डनच्या अगदी मध्यभागातून वाहणारा एक ओढा हा देखील पर्यटकांचे मन मोहून घेतो. एम्प्रेस गार्डन हे नैसर्गिकरीत्या खूप सौंदर्यपूर्ण तर आहेतच परंतु कृत्रिम निर्मितीचा देखील एक उत्तम संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.