Richest Village In India: भारताला खेड्यांचा देश असे देखील म्हटले जाते. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते व भारतामध्ये ग्रामीण भागात अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा परंपरा आणि प्रथा असल्यामुळे ग्रामीण भागाचे विशेष असे महत्त्व भारताच्या दृष्टिकोनातून आहे.
भारतीय ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय जर बघितला तर हा शेती असून त्यासोबतच शेतीशी संबंधित जोडधंदे मोठ्या प्रमाणावर भारतातील खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये केले जातात. एकंदरीत ग्रामीण भाग किंवा गाव म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कष्टकरी जनता आणि विशेषता शेती असे एकंदरीत चित्र उभे राहते.
तसेच आर्थिकदृष्ट्या जर बघितले तर ग्रामीण भाग हा शहरी भागाच्या तुलनेमध्ये जरा कमजोर समजला जातो. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत भारतातील एक गाव असे आहे की त्या ठिकाणी शहरातील लोकांपेक्षा देखील जास्त संपत्ती आहे.
या गावाचे एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. वाळवंटाच्या अगदी जवळ असलेले हे गाव गुजरात राज्यात असून त्या गावाचे नाव आहे माधापर हे होय. हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते.
माधापर गाव आहे भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत गाव
माधापर हे गाव गुजरात राज्यात असून ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील लोकांचा बँकेमधील असलेला पैसा जर बघितला तर एकूण 17 बँकांमध्ये सात हजार कोटी रुपये या गावच्या लोकांचे जमा आहेत.
याबागील प्रमुख कारण जर बघितले तर या गावात राहणारी बहुतेक कुटुंबे ही विदेशात राहतात व पैसा मात्र गावातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा करणे या ठिकाणच्या लोकांना आवडते व त्यांना ते पसंती देतात.
या गावात प्रामुख्याने पटेल या समाजाचे लोक राहतात व या गावाची लोकसंख्या सुमारे 32 हजार इतकी असून देशातील सर्वप्रमुख बँका या ठिकाणी असून जवळपास 17 मोठ्या बँका या गावात आहेत.
या बँकांमध्ये एसबीआय पासून पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक तसेच ॲक्सिस,आयसीआयसीआय बँक आणि युनियन बँक या प्रमुख बँकांचा समावेश आहे.
या गावाकडे एवढा पैसा आला कुठून?
या गावातील लोकांनी बँकांमध्ये 7000 कोटी रुपये जमा केले असून एवढा पैसा असण्यामागील जर प्रमुख कारण बघितले तर या गावात राहणाऱ्या कुटुंबातील अनेक सदस्य एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय आहेत. ज्यांनी स्थानिक बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले आहेत.
या गावातील जवळपास 1200 कुटुंबातील लोक आफ्रिकन देशांमध्ये तसेच ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये राहतात. या ठिकाणचे लोक विदेशात राहून देखील माधापर मध्ये पैसा जमा करणे पसंत करतात.
हे एक आदर्श गाव म्हणून देखील ओळखले जाते व या गावात असलेल्या पाणी तसेच स्वच्छता व चांगली ड्रेनेज सुविधा तसेच उत्तम अशी रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेले आहेत. माधापरमध्ये मोठमोठे बंगले तसेच सरकारी आणि खाजगी शाळा, सुंदर असे तलाव आणि मंदिरे देखील आहेत.