Maharashtra Tourist Place :- महाराष्ट्राला ज्याप्रमाणे निसर्ग संपन्न अशी किनारपट्टी लाभली आहे त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे नैसर्गिक संपदा असलेले ठिकाणे देखील महाराष्ट्रात आहेत. थंड हवेचे ठिकाणे, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अभयारण्य महाराष्ट्रात असून पर्यटनासाठी ही ठिकाणे खूप अद्भुत आणि अवर्णनीय असे आहेत. वन पर्यटनाचा ज्यांना मनमुराद आनंद घेण्याची इच्छा आहे अशांसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असून बहुतांश ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यात असून जळगाव जिल्ह्यात देखील असेच एक महत्त्वाचे स्थान आहे. जे पक्षी आणि प्राणी अभयारण्य असून अनेक वनस्पती संपदेनेदेखील समृद्ध आहे.
यावल अभयारण्य आहे पर्यटनासाठी खास
जळगाव जिल्ह्यात असलेले यावल अभयारण्याचा विचार केला तर सदैव हिरवेगार आणि प्रगत अशा जैवविविधतेने समृद्ध असलेला हा परिसर असून या ठिकाणी असलेल्या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्वामुळे हा परिसर खूप संपन्न असा आहे. महाराष्ट्र शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी या अभयारण्याची घोषणा केली. ज्या पर्यटकांना जंगल सफारीची हौस असते असे पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात व ज्यांना पक्षी पाहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पाहायचा आहे त्यांच्यासाठी हे अभयारण्य एक अद्भुत ठिकाण आहे.
रानपिंगळा, गरुड आणि सुतार पक्षांसह दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी या ठिकाणी बघायला मिळतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी पट्टेदार वाघाचे आणि बिबट्यांचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करते. यासोबतच हरीण, चिंकारा, रानडुकरापासून रान कुत्रा, अस्वल, लांडगा, कोल्हा, सांबर सारखे अनेक प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी प्रगत अशी वनसंपदा असून त्यामध्ये प्रामुख्याने अंजन, शिसव, साग, खैर, हिरडा आणि बेहडा सारखे अनेक वृक्ष या ठिकाणी पाहायला मिळतात.
या अभयारण्य मध्ये सुकी धरण असून ते 1977 मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी येतात. तसेच यावल अभयारण्यामध्ये असलेले चिंचाटी व्हूपॉइंट, पालोबा पॉईंट, पाच पांडव ही उंच शिखरे असून या ठिकाणहून आजूबाजूचा रमणीय देखावा डोळ्यांचे पारणे फेडतो. तसेच या ठिकाणी पावरा, तडवी तसेच कोळी आणि भिल्ल आदिवासी समाजाचे वास्तव्य असून या आदिवासींचे पारंपारिक लोकसंस्कृती देखील मनाला एक आनंद देऊन जाते.
या ठिकाणी मुक्ताबाईचे दर्शन तसेच संत चांगदेवांचे मंदिर देखील आपण पाहू शकतो. या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या मनुदेवीच्या दर्शनानंतर उनपदेव हे गरम पाण्याच्या झरे यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण देखील आपल्याला बघता येते. या ठिकाणी पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी पर्यटनाचा खास कालावधी
तुम्हाला देखील या ठिकाणी जायचा प्लान बनवायचा असेल तर तुमच्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम आहे. जाण्यासाठी या ठिकाणी शासकीय विश्रामगृह असून खाजगी निवासस्थानाचे देखील सोय आहे. एवढेच नाही तर या सोबत इथे युवक वसतिगृहाचे देखील सोय करण्यात आलेले आहे.
यावल अभयारण्याला जायचे असेल तर कसे जाल?
या ठिकाणी जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर या अभयारण्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन रावेर रेल्वे स्टेशन असून ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच पाल, रावेर, सावदा आणि भुसावळ ही जवळची बस स्थानक आहेत. जर काहींना विमानाने जायची इच्छा असेल तर औरंगाबाद विमानतळ या अभयारण्यापासून २६० किलोमीटर अंतरावर आहे.