स्पेशल

UPSC Success Story: महाराष्ट्रातील सायकल दुरुस्ती करणारा व्यक्ती झाला आयएएस अधिकारी! वाचा संघर्षाची कहाणी

UPSC Success Story:- एखादे विद्यार्थी विद्यार्थिनी इतक्या प्रचंड प्रमाणात विपरीत अशा कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेले असतात की यामधून बाहेर पडणे म्हणजे अशक्यप्राय वाटायला लागते. बऱ्याचदा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत असते. अशा परिस्थितीमध्ये एखादे उच्च स्वप्न पाहणे आणि तेही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही.

कधी कधी बऱ्याच तरुण तरुणींवर ऐन उमेदीच्या आणि शिकण्याच्या कालावधीमध्ये घरची जबाबदारी येऊन पडते व त्यांना शिक्षण अर्धवट सोडून वाटेल ते काम करून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परंतु यामध्ये असे अनेक तरुण-तरुणी आहेत की त्यांच्या मनामध्ये उच्च असे ध्येय असते व हे ध्येय कोणतीही परिस्थिती असताना किंवा कोणत्याही प्रकारचे काम करत असताना त्यांना स्वस्थ बसू देत नाही व ते ध्येय गाठण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करत असतात व प्रयत्न देखील करतात.

परंतु म्हणतात ना की मनामध्ये जिद्द,  पक्के केलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आणि आहे त्या परिस्थितीला कवटाळून बसण्यापेक्षा त्या परिस्थितीशी दोन हात करत मार्ग काढण्याची उर्मी ज्यांच्यामध्ये असते ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचतात व यशाचे शिखर गाठतात. याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील वरूण बरनवाल या अधिकाऱ्याचा विचार केला तर त्यांनी देखील अनेक प्रकारचा संघर्ष करून अभ्यास केला व विपरीत परिस्थितीत देखील अधिकारी होण्याचा सन्मान मिळवला आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 वरूण बरनवाल यांची संघर्षकथा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पालघर जिल्ह्यातील बोईसर या गावचे आयएएस  अधिकारी असलेले वरुण बरनवाल यांनी अतिशय विपरीत अशा आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये कष्ट घेतले अभ्यास केला व अधिकारी होण्याचा सन्मान मिळवला आहे. जर त्यांची एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडिलांचे निधन झाले व वरून यांना लहान वयामध्ये शाळा बंद करून त्यांचे वडिलांचे जे काही सायकल दुरुस्ती करण्याचे दुकान होते त्या ठिकाणी काम करण्याचेठरवले व उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सायकल दुरुस्तीचे काम सुरू केले.

सायकल दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांनी  मोठ्या कष्टाने शाळा देखील सुरू ठेवली व दहावी मध्ये चांगले मार्क मिळवले. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना अकरावीला ऍडमिशन घेता आले नाही. परंतु यावेळी त्यांच्या आई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या व स्वतः त्यांच्या आईने दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. तसेच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या वडिलांवर ज्या डॉक्टरांनी उपचार केलेले होते त्याच डॉक्टरांनी वरूण यांना अभ्यासाकरिता काही निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

वास्तविक पाहता त्यांना डॉक्टर व्हायचे होते. परंतु मेडिकलचा जो काही शिक्षणाचा खर्च होता तो खूप प्रचंड प्रमाणात असल्याने त्यांनी इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित करायला पसंती दिली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवले व इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात त्यांना कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली व या स्कॉलरशिप मधूनच त्यांनी त्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. या कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच त्यांना सरकारी अधिकारी व्हावे अशी इच्छा झाली व त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले. यामध्ये त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेकडून मदत मिळवली व याच संस्थेने त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता अभ्यास साठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी पुरवल्या.

या अनुषंगाने वरूण बरनवाल यांनी सर्वांचा विश्वास सार्थ ठरवला व ते यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झाले. त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या यूपीएससी सीएसइ 2016 या परीक्षेत AIR 32 वा क्रमांक मिळवला व त्यांची आता आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

या पद्धतीने जर आपण वरूण बरनवाल यांचा यशाचा विचार केला तर आपल्याला दिसून येते की आहे त्या परिस्थितीत मार्ग काढत कष्ट करून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे सिद्ध होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts