Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून भारतीय रेल्वेने एक मोठा इतिहास घडवला आहे. 2019 हेच ते ऐतिहासिक वर्ष ज्यावर्षी संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली. वंदे भारत एक्सप्रेस या नावाने ही सेमी हाय स्पीड ट्रेन आज संपूर्ण देशात ओळखली जात आहे. आतापर्यंत देशातील 55 महत्त्वाच्या मार्गांवर ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे.
आपल्या महाराष्ट्राला देखील या प्रकारातील 8 गाड्या मिळाल्या आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. या दहा गाड्या एकाच वेळी सुरू केल्या जाणार हे विशेष. देशाचे पंतप्रधान यांचा वंदे भारत एक्सप्रेस हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
आतापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. येत्या काळात ज्या 10 नवीन सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहेत त्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला दाखवणार आहेत.
झारखंड येथील जमशेदपूर येथून 15 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
महाराष्ट्रालाही आणखी एका नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे. दरम्यान आता आपण या दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस चे रूट कसे असतील या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
टाटानगर – पाटणा, वाराणसी – देवघर, टाटानगर-ब्रह्मपूर, रांची-गोड्डा, आग्रा-बनारस, हावडा-गया, हावडा-भागलपूर, दुर्ग-विशाखापट्टनम, हुबळी-सिकंदराबाद, पुणे-नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. अर्थातच पुण्याला देखील ही सेमी हाय स्पीड ट्रेन मिळणार आहे.
सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे चालवली जात आहे. पण थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
मात्र 15 सप्टेंबरला पुणे रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. अजून या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार, ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? या संदर्भात कोणतीच अपडेट हाती आलेली नाही.
पण, लवकरच या संदर्भात रेल्वे बोर्डाकडून एक परिपत्रक निर्गमित केले जाईल आणि यामध्ये या ट्रेनची सर्व माहिती नमूद असेल असे म्हटले जात आहे.