Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील पहिली स्वदेशी बनावटीची हायस्पीड ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाचा मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्राला आतापर्यंत 11 वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत. यातील तीन गाड्या अलीकडेचं सुरू झाल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान, यापैकी नागपुर ते सिकंदराबाद या मार्गावर सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपराजधानी नागपूर येथून सुरु झालेल्या या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या गाडीचे डबे कमी होणार आहेत.
रोज 900 च्या वर सीट्स रिकाम्या जात असल्याने 20 डब्यांच्या या गाडीचे कोचेस कमी करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. खरंतर 20 डबे असणारी ही देशातील दुसरीच वंदे भारत एक्सप्रेस आहे.
मात्र या गाडीला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब विचारात घेता आता या गाडीचे डबे कमी करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. खरंतर ही गाडी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली. अर्थातच ही गाडी सुरू होऊन फक्त दीड ते दोन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.
दरम्यान आता या गाडीचे डबे कमी करण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला असून हा प्रस्ताव मान्य झाल्यास या गाडीचे डबे कमी होणार आहेत. विशेष बाब अशी की या प्रस्तावाला लवकरच रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळेल असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.