Vande Bharat Metro : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
महाराष्ट्राला देखील अकरा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या 11 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यात ज्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सुरू आहे त्या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जातोय. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेर देखील या गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत मेट्रो ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू करण्यात येणार आहे.
यातील वंदे भारत मेट्रो ट्रेनचे संचालन नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेन ही अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू करण्यात आली असून आता याच मेट्रो ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत मेट्रो ट्रेन आता मध्य प्रदेश मध्ये देखील धावणार आहे. गुजरात नंतर आता मध्य प्रदेश राज्याला वंदे भारत मेट्रो ट्रेनची भेट मिळणार असून यामुळे मध्यप्रदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे मत व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इंदूर शहर यांच्यातील रेल्वे संपर्क सुधारण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी, दोन्ही शहरांदरम्यान वंदे मेट्रो चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
पश्चिम रेल्वेचा भोपाळ विभाग लवकरच त्याचे मूल्यांकन करेल. वंदे मेट्रो चालवण्याच्या वेळेवर चर्चा होईल. अन मग ही गाडी सुरू करण्याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मार्गावर इंदूर-भोपाळ डबल डेकर धावत होती त्याच मार्गावर वंदे मेट्रो चालवण्यास पूर्ण वाव असल्याचे दिसते कारण सध्या हा मार्ग रिकामा आहे आणि त्यावर कोणतीही ट्रेन धावत नाहीये.
पण, राणी कमलापती रेल्वे यार्डच्या पिटलाइनमध्ये वंदे मेट्रोच्या देखभालीचा स्लॉट केव्हा उपलब्ध होईल हे भोपाळ विभागाला पाहावे लागेल. जर स्लॉट ठरला, तर ही ट्रेन सकाळी भोपाळहून निघून इंदूरला जाईल आणि परत येईल आणि दुपारी भोपाळला पोहोचेल. त्यानंतर तेथून संध्याकाळी पुन्हा इंदूरला येईल आणि रात्री इंदूरहून भोपाळला पोहोचणार आहे.