Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची म्हणजेच मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर आली. म्हणजेच ही गाडी सुरू होऊन आता जवळपास पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे.
पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. यानंतर ही गाडी देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर सुरू झाली. आतापर्यंत देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातील तीन गाड्या काल अर्थातच 31 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. या गाड्या चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावणार आहे.
यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्राला आतापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. दुसरीकडे, वंदे भारत एक्सप्रेस ला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन रुळावर उतरवणार आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस येत्या काही दिवसांनी लाँच होणार आहे. खरे तर या गाडीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पण ही गाडी नेमकी कधी लॉन्च होणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी सुद्धा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण नुकतेच संपन्न झाले आहे.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, पुढील मूल्यमापनासाठी हे स्लीपर कोच ट्रॅकवर ठेवण्यापूर्वी पुढील 10 दिवसांत या ट्रेनच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतील.
आम्ही पुढील तीन महिन्यांत वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे रुळावर धावेल यासाठी प्रयत्नशील असून प्रवाशांच्या सेवेत पोहोचेल, अशी अपेक्षा असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. अर्थातच, येत्या तीन महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावू शकते.