Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हा केंद्रातील सरकारचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. ही गाडी सुरू झाल्यापासून रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच जलद आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे या गाड्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत.
मात्र सध्या ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत त्या चेअरकार प्रकारातील आहेत. अर्थातच या गाड्यांमधून प्रवाशांना बसून प्रवास करता येतो. म्हणून शयनयान प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात होती.
रेल्वे सुद्धा यासाठी आग्रही होते. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांनी भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे.
पुढील वर्षी अर्थातच 2025 मध्ये ही गाडी रुळावर धावताना दिसेल. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्ट मध्ये पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये तब्बल 10 मार्गांवर ही गाडी सुरू होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन मुळे प्रवाशांना आता झोपून सुद्धा वंदे भारत मधून प्रवास करता येणार आहे. ही गाडी लांब पल्ल्याच्या मार्गांवर अधिक लाभप्रद ठरण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस च्या चाचण्या आता सुरू झाले आहेत.
पुढील दोन महिने या गाडीच्या वेगवेगळ्या चाचण्या पूर्ण केल्या जाणार आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात ही गाडी व्यावसायिक वापरासाठी सुरू होणार आहे.
पुढील वर्षी देशातील दहा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे मात्र आपल्या महाराष्ट्राला याचा लाभ मिळणार की नाही हा मोठा सवाल आहे. मीडिया रिपोर्टनुसार आपल्या महाराष्ट्राला देखील या गाडीची भेट मिळण्याची शक्यता आहे.
पुणे ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी चालवली जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. असे झाल्यास पुणेकरांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर देखील ही गाडी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि देशातील कोणत्या दहा मार्गांवर ही गाडी सुरू होणार अजून ते दहा मार्ग निश्चित करण्यात आलेले नाहीत. यामुळे पुणे ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.