Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत चेअर कारनंतर आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. ही ट्रेन भारतभर चालवण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे आहे. चेअरकार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे.
ही ट्रेन देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. दरम्यान आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा लवकरच चालवली जाणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, 1 सप्टेंबर रोजी वंदे भारत स्लीपर ट्रेनची पाहणी केली. यामुळे या ट्रेनची झलक पाहायला मिळाली. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
आता ही ट्रेन येत्या 10 दिवसांत चाचणीसाठी पाठवली जाईल, अशी माहिती समोर येत असून येत्या तीन महिन्यात ही गाडी प्रत्यक्षात वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
या मार्गावर सुरू होणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पटना ते दिल्ली दरम्यान चालवली जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. ही 16 कोचं असणारी ट्रेन पटना ते दिल्ली हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण करणार आहे.
या गाडीचा ताशी वेग 130 किलोमीटर चा असेल. याशिवाय मुंबई ते दिल्ली दरम्यानही ही गाडी चालवली जाईल अशी माहिती समोर येत आहे. चेअरकार वंदे भारत पेक्षा स्लीपर वंदे भारत मध्ये प्रवासी संख्या अधिक राहणार आहे.
चेअरकारमध्ये 8 कोच आणि 530 सीट्स आहेत. पण, स्लीपर ट्रेनमध्ये 16 कोच आणि 823 बर्थ राहणार आहेत. आठशे ते बाराशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांवर ही गाडी चालवली जाणार आहे.
तिकीट दर किती असणार?
या गाडीचे तिकीट दर किती असणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. मात्र अद्याप या गाडीच्या तिकीट दराबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये राजधानी एक्सप्रेसचे जसे तिकीट दर आहेत तसेच वंदे भारत स्लीपर ट्रेन चे देखील तिकीट दर राहणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.