Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
आपल्या महाराष्ट्राला देखील 11 वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे लवकरच महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. दुसरीकडे देशात वंदे भारत मेट्रो देखील सुरू झाली आहे. अहमदाबाद ते भुज यादरम्यान देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सुरू झाली आहे.
आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे. आगामी तीन महिन्यात ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देशातील कोणत्या मार्गावर धावणार हे आणखी स्पष्ट झालेले नाही. पण अशातच दिल्ली ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
ही ट्रेन जानेवारी 2025 पासून धावण्याची अपेक्षा आहे आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये AC 3 Tier (3A), AC 2 Tier (2A), आणि AC फर्स्ट क्लास (1A) सारख्या सुविधा असतील, ज्यामुळे प्रवास अतिशय आरामदायी आणि सोयीस्कर होईल.
या ट्रेनची खास गोष्ट अशी आहे की, ती राजधानी नवी दिल्लीहून संध्याकाळी ७:०० वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता श्रीनगरला पोहोचणार आहे. म्हणजे ही गाडी १३ तासांपेक्षा कमी वेळात ८०० किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मार्गात अंबाला, लुधियाना, जम्मू तवी आणि कटरा या प्रमुख स्थानकांचा समावेश असेल. गाडी या सर्व प्रमुख स्थानकावर थांबणार असा विश्वास व्यक्त होतोय.
भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, एसी 3 टियरसाठी सुमारे 2,000 रुपये, एसी 2 टियरसाठी 2,500 रुपये आणि एसी प्रथम श्रेणीसाठी 3,000 रुपये तिकीट दर अपेक्षित आहे. ही ट्रेन जम्मू-काश्मीरला चांगली कनेक्टिव्हिटी देईल आणि भविष्यात बारामुल्लापर्यंत या गाडीचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.