Vande Bharat Train : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच एक मोठी भेट मिळणार आहे. ही भेट साधी-सुधी राहणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रातुन आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड येथील जमशेदपूरमधून दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. 15 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
यामध्ये नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश राहणार आहे. याशिवाय पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस चे देखील ट्रायल रन घेतले जाणार आहे. म्हणजे आगामी काळात पुणे ते हुबळी दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
एवढेच नाही तर रेल्वेने पुणे ते कोल्हापूर अशी स्वातंत्र गाडी सुरू करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. यासोबतच राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला सातवी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.
मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. खरंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. या दोन्ही शहरादरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस ही एकमात्र अशी एक्सप्रेस गाडी आहे जी इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक जलद आहे.
ही ट्रेन 518 किमीचे अंतर 10:30 तासात पार करते. महालक्ष्मी एक्स्प्रेसचा सरासरी वेग ताशी 48.94 किलोमीटर आहे. त्या तुलनेत वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग आधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत गंतव्यस्थानी पोहोचता येणार आहे.
यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसच्या संख्येत वाढ होणार आहे सोबतच राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे.
सध्या भारतातून 55 वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. तसेच 15 तारखेला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. अर्थातच वंदे भारत एक्सप्रेसची ही संख्या येत्या काही दिवसात 70 वर जाणार आहे.