Viral Farmer : शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित करत असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांद्याच्या बाबतीत सध्या असच पाहायला मिळत आहे. बाजारात आता नवीन लाल कांदा दाखल होत असून कांदा अतिशय कवडीमोल दारात विक्री होत आहे. लाल कांदा अधिक काळ साठवता देखील येत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून कांदा विक्री करावा लागत आहे.
यामुळे कांदा उत्पादकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. अशातच कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याने कांदा अग्नीडाग समारंभाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने चक्क रक्ताने निमंत्रण पत्रिका लिहून या कार्यक्रमाचा सांगावा मुख्यमंत्री महोदयांना पाठवला आहे.
यामुळे सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना रक्ताने पत्र लिहून आपल्या व्यथा जर शासनदरबारी मांडाव्या लागत असतील तर ही एक शरमेची बाब असल्याच मत शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवलाच्या नगरसुल येथील कृष्णा डोंगरे यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री महोदय यांना निमंत्रण पत्रिका लिहत कांदा अग्नीडाग सोहळ्याला हजेरी लावण्याचे निमंत्रण पाठवले आहे.
खरं पाहता कांदा पिकासाठी केलेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. सध्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिहिलेली ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आता मुख्यमंत्री महोदय खरंच या कार्यक्रमाला हजेरी लावतात का याची उत्सुकता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना लागून आहे.
दरम्यान या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. हा कार्यक्रम 10 मार्च रोजी नगरसुल जवळील मातुलठाण येथे होणार आहे. दरम्यान शेतकरी कृष्णा डोंगरे यानी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत, नानाविध अशा संकटांनी बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आता कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात विकला जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे मत यामध्ये आहे.
तसेच त्यामध्ये मुख्यमंत्री यांना उद्देशून आपण शेतकऱ्याचे पुत्र आहात. यामुळे या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही अद्याप गप्प आहात. अशा परिस्थितीत आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून सदर शेतकऱ्याने केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर कायमच सक्रिय राहणारे मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी 26 जानेवारी रोजी एका लहानग्याने लोकशाही बद्दल आपले जे काही मत व्यक्त केले होते त्यावर प्रभावित होऊन मुख्यमंत्री महोदय यांनी या लहानग्याची भेट घेतली. एवढेच नाही तर त्याच्या आजारपणा संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना समजताच त्याच्या उपचाराची जबाबदारी देखील घेतली.
त्यामुळे आता सोशल मीडियावर हे पत्र देखील मोठ्या वेगात व्हायरल झाले आहे. परिणामी मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर ही बाब गेलीच असेल तसेच निमंत्रण पत्रिका देखील या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.