स्पेशल

काय सांगता ! सांगलीत आनंदात पार पडला ‘आनंदी’ गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा; अख्ख्या जिल्ह्यात रंगली या अनोख्या सोहळ्याचीं चर्चा

Viral News : राज्यातील शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शेतकरी असेही अनेक उपक्रम राबवत असतात ज्यामुळे समाजात एक वेगळा आदर्श कायम होत असतो. असाच काहीसा अनोखा उपक्रम सांगली जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. यातील एका शेतकरी कुटुंबाने चक्का आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे.

हा सोहळा त्यांनी एवढा शाही बनवला की याची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तालुका कडेगावचे मौजे कडेपूर येथील पशुपालक शेतकरी किरण लालासो यादव यांनी आपल्या पोटच्या लेकी प्रमाणे आपल्या दावणीला बांधलेल्या गाईच डोहाळ जेवण घातले आहे. खरं पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.

विशेषता शेतीमध्ये गाईला पूर्वापार महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत गाईला देवीचा दर्जा देण्यात आला आहे. गाईला हिंदू संस्कृतीमध्ये देवीचा दर्जा देण्यात आला असल्याने आणि शेतीमध्ये गाईचे महत्व अधोरेखित करण्यासाठी देशी गोवंश संवर्धन करणे हेतू राज्यातील गोभक्ताकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यादव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून देशी गाईंच्या जातीचे संगोपन करत आहेत.

दरम्यान त्यांनी गेल्या एक वर्षापूर्वी खिल्लार जातीच्या गायीचे संगोपन करायचं देशी गोवंश संवर्धन करायचा या हेतूने खिलार जातीची एक गाय खरेदी केली. या गाईच्या आगमनाने यादव कुटुंबामध्ये अंदाजे वातावरण तयार झाले यामुळे त्यांनी या गाईचे नाव आनंदी असे ठेवलं. आता याच आनंदी गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यादव कुटुंबियांनी पार पाडला. या सोहळ्याला शाही बनवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांसहित पै-पाहुण्यांना निमंत्रण धाडलं.

गावकऱ्यांनी आणि पै पाहुण्यांनी मोठ्या आनंदाने आनंदीच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवली. आनंदीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यामुळे मोठ्या दिमाखात पार पडला. मंगळवारी हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी यादव कुटुंबीयांनी आपल्या आनंदी गाईला सजवले होते. अंगावर झूल, रंगविलेली शिंगे, शिंगांना बांधलेले गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातलेली आनंदी गाय सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत होती.

आनंदीचा हा साज सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या सोहळ्यासाठी स्वतंत्र मंडप या ठिकाणी लावण्यात आला होता, एवढेच काय तर या सोहळ्याची माहिती पंचक्रोशीत व्हावी अनुषंगाने या शाही सोहळ्याचे बॅनर देखील गावात लावण्यात आले होते. या सोहळ्याला गाईसाठी वेगवेगळ्या पदार्थांचे नियोजन करण्यात आले सोबतीला हिरवा चारा देखील होता. सोहळ्या दरम्यान महिलांनी गौपूजन केले.

पंचारतीने ओवाळून गाईचे औक्षण झाले. गायीच्या ओटीपूजनाचा कार्यक्रम झाला आणि मग फोटोसेशन देखील दिमाखात पार पडले. विशेष म्हणजे या डोहाळे जेवणात एक हजाराहून अधिक लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम यादव कुटुंबीयांनी ठेवला. नव्हेनव्हे तर रात्री कीर्तनाचा देखील कार्यक्रम होता. यामुळे हा शाही सोहळा सध्या पंचक्रोशीत चांगलाच गाजत आहे. हा सोहळा आयोजित करून यादव कुटुंबियांनी गाईचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम या ठिकाणी केले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts