Virar Alibaug Corridor : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. मोठं-मोठे महामार्ग विकसित केले जात आहेत. निश्चितच यामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडत आहे. मात्र काही महामार्गांच्या कामाला तांत्रिक अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर देखील असाच एक महामार्ग असून या कॉरिडॉरचं काम तब्बल बारा वर्षांपासून रखडलेला आहे.
हा कॉरिडोर प्रस्तावित करून तब्बल बारा वर्षे झाली मात्र तरीही अद्याप या कॉरिडॉर साठी टेंडरची प्रक्रिया राबवली गेलेली नाही. दरम्यान आता विरार अलिबाग कॉरिडॉर च्या टेंडर संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पुढल्या वर्षी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कॉरिडॉर साठी आवश्यक टेंडर प्रक्रिया मे महिन्यात राबवली जाणार आहे. याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे.
विरार अलिबाग कॉरिडोर बाबत थोडक्यात
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतला होता. मात्र या प्राधिकरणाला हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यात यश आले नाही. अशा परिस्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हा प्रकल्प आला असून तेव्हापासून या प्रकल्पाला गती देण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे. महामंडळाकडे या प्रकल्पाचे काम आल्यानंतर प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाला.
त्यानंतर भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 1300 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. विरार अलिबाग कॉरिडोर हा 128 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामध्ये 16 मार्गीका म्हणजे लेन राहणार आहेत. या प्रकल्पासाठी केवळ भूसंपादन म्हणून 22 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे या निधीची तरतूद करणे, राज्य रस्ते विकास महामंडळासाठी मोठ्या आव्हानात्मक होते. मात्र आता हे आव्हान संपुष्टात आले असून निधीची तरतूद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी हुडको कडून निधी उपलब्ध केला जाणार आहे. विशेष म्हणजे लवकरच हा निधी हुडको कडून राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणार आहे. यामुळे भूसंपादन मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
टेंडर प्रक्रियेसाठी जवळपास सात ते आठ महिन्याचा कालावधी लागेल म्हणजेच या मार्गाचे प्रत्यक्ष काम हे 2024 मध्येच सुरू होणार आहे. निश्चितच या कॉरिडोर मुळे विरार आणि अलिबाग दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता लवकरच मृत रूप घेईल अशी आशा देखील या निमित्ताने व्यक्त होत आहे.