कलिंगडच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-
अर्का श्यामा वाण :- या जातीच्या फळाचा गडद हिरवा- काळा रंग असतो. ३ ते ४ किलो वजनाचे फळ बनते. फळाचा स्वाद गोड, कुरकुरीत, लाल चुटूक रंगाचा गर असतो. लंबगोलाकार आकार असतो आणि यामध्ये टीएसएस- १२ टक्के असते. या जातीपासून 60 ते 70 दिवसात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.
शुगर बेबी :- कलिंगडची ही एक सुधारित जात आहे. विशेष म्हणजे आपल्या राज्यातील हवामान या जातीला मानवते आणि राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची फळं मध्यम आकाराची, तीन ते पाच किलो वजनाची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून गर गर्द लाल रंगाचा, खुसखुशीत असतो. उत्तम गोडी, उत्कृष्ट चव आणि मध्यम आकार यामुळे ही जात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव असलेले विभाग सोडून या जातीची लागवड करावी.
अर्का माणिक :- ही देखील कलिंगड चे एक सुधारित वाण आहे. ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था, बंगळुरू या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आली आहे. या जातीची फळं इतर जातीच्या तुलनेत लांबट, फिक्कट हिरव्या रंगाची असून वर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळांचा रंग गर्द गुलाबी असतो.
या जातीचे कलिंगड चवीला अतिशय गोड असते. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या फळांचे सरासरी वजन हे सहा ते आठ किलो असते. ही जात भुरी, केवडा रोगांना प्रतिकारक आहे. ही साठवणूक, वाहतुकीस उत्तम आहे. यात साखरेचं प्रमाण 12 ते 13 टक्के असते. यापासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं असल्याचा दावा केला जातो.