Weather Update : मार्च महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्यपेक्षा अधिक सरासरी तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात जसं तापमान असतं तसं तापमान गेल्या फेब्रुवारी महिन्यातच पाहायला मिळाला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अमेरिकन हवामान विभागाने एल निनोमुळे भारतात मान्सून काळात सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज बांधला आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेने दोनदा असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे यावर चिंता व्यक्त करणे साहजिकच आहे. अशातच मात्र आणखी एका संस्थेने एलनिनोचा अंदाज बांधला आहे. यामुळे चिंतेत अजूनच वाढ होत आहे. जरी भारतीय वैज्ञानिकांनी अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात वर्तवलेला एलनिनोचा अंदाज घाईचा असल्याचे सांगितले असले तरी देखील आता या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
अमेरिकन हवामान विभागाच्या पाठोपाठ इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डीएस पै यांनी यंदा एलनिनो या हवामान प्रणालीमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे. यामुळे भारतात ज्या पद्धतीने 1972 मध्ये भीषण दुष्काळ जाणवला होता तशी परिस्थिती 2023 मध्ये देखील उद्भवेल अशी भीती आता व्यक्त होत आहे. खरं पाहता या हवामान प्रणालीचा अर्थातच एलनिनोचा प्रभाव एक वर्ष टिकतो यामुळे पुढील हंगामातील पीकचक्रावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. डीएस पै यांनी सांगितल्याप्रमाणे तीन वर्ष ला निना हवामान प्रणाली कार्यरत राहिल्यानंतर आता एल निनो हवामान प्रणाली सक्रिय होणार आहे.
यामुळे 1952 1965 आणि 1972 सारख्या दुष्काळाची पुनरावृत्ती या वर्षी होण्याची शक्यता आहे. साहजिकच याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसण्याची शक्यता असली तरी देखील यामुळे समाजातील इतरही घटक प्रभावित होणार आहेत. आपल्या देशाचे अर्थव्यवस्थाच ही मुळात कृषीशी निगडित असल्याने यामुळे अर्थव्यवस्थेला धक्का लागणार आहे. एवढेच नाही तर इतर उद्योगही यामुळे प्रभावित होतील. साहजिकच यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवताना शासनाला नाकी नऊ येणार आहेत. याचा सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका मात्र बसणार आहे.
यासोबतच कृषी मंत्रालयाचे सल्लागार बी एल मीना यांनी सांगितले की एलनिनोमुळे खराब मान्सून झाल्यास कृषी उत्पादनावर याचा परिणाम पाहायला मिळेल. दरम्यान अमेरिकन हवामान विभागाने वर्तवलेल्या एलनिनोच्या अंदाजानंतर भारतातील काही वरिष्ठ हवामान तज्ञांनी आत्तापासूनच याविषयी अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभाग जो काही आपला मान्सूनचा पहिला सुधारित अहवाल सादर करेल त्यावरच एल निनो बाबत योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे. निश्चितच आता संपूर्ण देशवासीयांचे हवामान विभागाच्या मान्सून बाबतच्या आपल्या पहिल्या अहवालाकडे लक्ष लागून राहणार आहे.