रेल्वेचे ‘कवच’ म्हणजे काय ?; या प्रणालीमध्ये रेल्वे कशी काम करते जाणून घ्या … !

Ahmednagarlive24 office
Published:

पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघात रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला, ही गाडी निजबारीसमोर उभी असताना भरधाव वेगात असलेल्या मालगाडीने पाठीमागून धडक दिली.

ज्यामध्ये गाडीची तीन डबे रुळावरुन उतरले तर एका डब्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी धाव घेत गाडीच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.

दरम्यान या अपघातामुळे ‘कवच’ ही प्रणाली चर्चेत आली असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ‘कवच’ प्रणालीची माहिती देणारी एक जुनी चित्रफीत समाज माध्यमांतून फिरू लागली आहे.

तर मग जाणून घेवूया नेमकी ‘कवच’ या प्रणालीबाबत –

ट्रेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टीम, जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांचा वेग कितीही असला तरी ‘कवच’मुळे या दोन गाड्या एकमेकांना धडकणार नाहीत. हे तंत्रज्ञान ओव्हर स्पीडिंग टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंगसाठी तयार करण्यात आले आहे. त्याचवेळी ट्रेन फाटकाजवळ पोहोचली की आपोआप शिटी वाजणार. हे कवच तंत्रज्ञान ट्रेनमध्ये बसवलेल्या दोन इंजिनमध्ये टक्कर होऊ देणार नाही. तसेच, आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश पाठवेल. यात नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे ट्रेनची हालचाल देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर ‘कवच’ म्हणजे रेल्वेची अपघात विरोधी यंत्रणा.

दुर्दैवाने ज्या मार्गावर हा अपघात झाला, तेथे ही प्रणाली बसवण्यात आली नव्हती. सध्या केवळ एक हजार ५०० किमी अंतराच्या मार्गावर ही प्रणाली सुरू आहे.

यंदा तीन हजार किमी मार्गावर ती बसवण्यात येणार असून, पुढील वर्षी आणखी तीन हजार किमी मार्गावर ती सुरूहोणार असल्याचे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा यांन सांगितले आहे.

या अपघातामुळे ‘कवच; प्रणालीमध्ये रेल्वे कशी काम करते, कोणत्याही परिस्थितीत ही प्रणाली काम करते, यामुळे रेल्वेचे अपघात टाळू शकतील का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.जर या प्रणालीमुळे रेल्वेचे अपघात टाळता यात असतील तर ही प्रणाली सर्व मार्गावर कधी बसवणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

कवच प्रणालीमध्ये रेल्वे अशी काम करते

रूळ, सिग्नल आणि स्टेशन यार्डात ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग्ज’ (आरएफआयडी) बसवले जातात. रेल्वेचा मार्ग, स्थिती आणि दिशा हे यांद्वारे कळू शकते. रेल्वेचालक धावत्या गाडीचा वेग वेळीच कमी करू शकला नाही, तर कवच प्रणाली कार्यरत होते आणि ती स्वयंचलितरीत्या गाडीस ब्रेक लावते. एखाद्या चालकाने सिग्नल दुर्लक्षित केला, वेगमर्यादा ओलांडली, तर ही यंत्रणा लागलीच अलर्ट देते किंवा गाडी थांबवते. त्यामुळे पुढील धोका टळतो.

स्वदेशी बनावटीची यंत्रणा

ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची यंत्रणा सुरक्षा (एटीपी) प्रणाली असून भारतात होणाऱ्या रेल्वे दुर्घटना, खास करून रेल्वेंची धडक टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’च्या साह्याने तयार केली आहे. २०१२ मध्ये या यंत्रणेवर काम सुरू करण्यात आले, तेव्हा तिला ‘ट्रेन कोलिजन अव्हॉयडन्स सिस्टिम’ असे नाव देण्यात आले होते. २०१५ ते २०१७ या काळात तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. २०२२ मध्ये ती पूर्ण झाली. दरम्यान, तिचे नामांतर करण्यात आले. आता ती ‘कवच’ म्हणून ओळखली जात आहे.

कमी दृश्यमानतेतही करते काम
अनेकदा पाऊस, धुके, डोंगराळ प्रदेश यामुळे रेल्वेमार्गावरील दृश्यमानता खूप कमी असते. अशा वेळीही कवच कामास येते. चालकासमोर बसवलेल्या ‘ऑन बोर्ड डिस्प्ले ऑफ सिग्नल आस्पेक्ट’ (ओबीडीएसए) च्या मदतीने चालक सिग्नल पाहू शकतात. एरवी सिग्नल पाहण्यासाठी चालकास खिडकीबाहेर डोकवावे लागते.

धडक टाळते
एकाच मार्गावरून चुकून दोन ट्रेन धावत असतील, तर अशा वेळी कवच प्रणाली फार महत्त्वाची ठरते. ही यंत्रणा स्वयंचलितरीत्या त्या दोन्ही ट्रेनचा वेग, दिशा, मार्ग हे सारे वेळीच ओळखते व तातडीने गाडीचे ब्रेक लावते. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात टाळून जीवित व वित्तहानी टाळली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe