सुजय विखे काय म्हणाले ?
“निळवंडे धरणाचं काम झाल्यामुळे निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेलंय. खरं तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहाता तालुक्यातील लोकांना होतोय. त्यामुळे मला असं वाटतं, की जर भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर नक्कीच मला संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायला आवडेल. यामध्ये पक्ष संघटनेचा जो काही आदेश राहील, त्या आदेशाला बांधिल राहून काम करत राहू…” असं म्हणत सुजय विखेंनी आपला इरादा पु्न्हा स्पष्ट केला. आता हा इरादा सुजय विखेंचा की थेट केंद्रीय भाजपचा..? हे समजायला सध्यातरी चान्स नाही. पण सुजय विखेंचं हे स्टेटमेंट, हलक्यात घेऊन नक्कीच चालणारं नाही.
स्टेटमेंटचा टायमिंग…
सुजय विखेंनी हे स्टेटमेंट दिल त्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईत केंद्रीय भाजपच्या नेत्यांची बैठक होती. या बैठकीसाठी भाजप प्रभारी भुपेंद्र यादव, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, माजीमंत्री प्रल्हाद पटेल, मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह दिग्गज नेते मुंबईच्या भाजप कार्यालयात आले होते. गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडल्याच्या चर्चा आहेत. भाजप लढणार असणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे ५० मतदारसंघात फिरून, भाजपच्या एका टिमने आढावा घेतला आहे. तोच आढावा, सोमवारच्या बैठकीत मांडला गेल्याच्या बातम्या काही मिडिया हाऊसने दिल्या. आता भाजपच्या गुजरातमधील दोन नेत्यांनी संगमनेरमध्ये मुक्काम ठोकल्याच्या बातम्याही काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरु आहेत. आता या सगळ्या बातम्यांचा संदर्भ पाहिला तर, संगमनेरवर भाजपचे विशेष लक्ष आहे आणि संगमनेरची जागा भाजपलाच लढायची आहे, या निष्कर्षापर्यंत सहज जाता येतं.
तगडा उमेदवार द्यावा लागणार …
आता या सगळ्या बातम्यांचे संदर्भ पाहिले तर मुंबईची आढावा बैठक होती त्याच दिवशी सुजय विखेंनी संगमनेरमधून लढण्याची इच्छा दुसऱ्यांदा व्यक्त केली. म्हणजेच सुजय विखेंनाच थोरातांविरोधात उतरवायचं, असा तर भाजपचा प्लॅन नाही ना..? हा प्रश्नही पडतो. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, थोरातांना पराभूत करायचे तर भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार हे नक्की आहे. मग हा तगडा उमेदवार म्हणजेच सुजय विखेच असावा, असेही एका अर्थी वाटते. कारण नुसतं सुजय विखेंनी इच्छा व्यक्त केली अन् अमित शाहांची गुजरातची टीम संगमनेरमध्ये आली, असं होऊ शकत नाही. तर अमित शाहांनी लक्ष घातलं म्हणजे थोरातांना पराभूत करण्याची तयारी खूप दिवसांपासून सुरु आहे, असाही एक अर्थ निघतो. कदाचित भाजपनेच सुजय विखेंना संगमनेरची तयारी करण्याचे सांगितले असावे, असाही एक अंदाज बांधता येतो.