Majhi Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध झालेली योजना असून नुकतेच महाराष्ट्राच्या सत्ता पटलावर विराजमान झालेल्या महायुती सरकारच्या घवघवीत अशा यशामागे या योजनेचा महत्त्वपूर्ण असा हातभार आहे. आपल्याला माहित आहे की, शिंदे सरकारच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती
व त्या घोषणेनुसार पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती व त्यानंतर ही योजना कार्यान्वित झाली व आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
परंतु विधानसभा निवडणूक जेव्हा लागली तेव्हा महायुती सरकारच्या माध्यमातून जाहीरनामा घोषित करण्यात आला होता व त्यामध्ये म्हटले होते की जर सत्तेत महायुती सरकार आले तर लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ.
आता सत्तेमध्ये महायुती सरकार आले आहे व आता त्यामुळे जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेप्रमाणे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये केव्हा मिळतील ही उत्सुकता लागून राहिली आहे. या अनुषंगाने माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेच्या संदर्भात अनेक मुद्यांना धरून महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव हप्ता देण्याचा जो काही निर्णय आहे तो साधारणपणे मार्च महिन्यात घेतला जाईल. कारण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे व त्यामध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
इतकेच नाही तर डिसेंबरचा आता पंधराशे रुपयांचा हप्ता कधी द्यायचा याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत ठरेल असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या अर्जांची छाननी अजून सुरू आहे. यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात वीस लाख लाभार्थी आहेत.
तसेच जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकाच वेळी जमा केले होते व नंतर सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले होते. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल असे ते म्हणाल्या. सध्या या योजनेसाठी असलेल्या अर्जदारांचा आकडा दोन कोटी 47 लाखांपर्यंत गेला आहे.
परंतु काही निकष किंवा अर्जातील त्रुटीमुळे 34 ते 47 लाख महिला लाभार्थींचा फरक पडू शकतो. या योजनेचे मूळ लक्ष्य हे सुमारे अडीच कोटींचे होते. या योजनेबाबत या पुढचा कोणताही निर्णय आता मंत्रिमंडळात होईल. तसेच नोंदणी करताना सगळ्यांची नोंदणी झाली व आधार जोडणी नसेल तर अर्ज रद्द होईल असे देखील अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.