Who Is Amol Khatal : संगमनेरचा निकाल पाहिल्याबरोबर अनेकांच्या मनात Who Is Amol Khatal? असा प्रश्न घुमसत आहे. संगमनेर म्हणजेच थोरात आणि थोरात म्हणजेच संगमनेर हे जवळपास चार दशकांचे समीकरण. मात्र आज हे समीकरण एका अवलियाने फेल केलं आहे. त्या अवलियाचे नाव आहे अमोल खताळ. खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
अर्थातच खताळ यांच्यामागे विखे पिता-पुत्रांची संपूर्ण यंत्रणा होती हे कोणापासून लपून राहिलेले नाही. यामुळे संगमनेरचा हा विजय जेवढा अमोल खताळ यांचा आहे तेवढाच विखे पाटील घराण्याचा देखील आहे. किंबहुना खताळ यांच्यापेक्षा हा विजय विखे पाटील परिवाराचाचं अधिक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही हे तेवढेच खरे.
खताळ यांच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जबरदस्त फिल्डिंग लावली होती. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या पराभवामागे कुठे ना कुठे बाळासाहेब थोरात यांचा हात होता आणि याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी थोरात यांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटील यांनी लक्ष केंद्रित करत थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम केला अशा चर्चा संगमनेरच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत.
खताळ यांनी दहा हजार 560 मतांनी थोरात यांना पराभूत केले. या विजयामुळे 1985 पासून बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मधील वर्चस्व समाप्त झाले असून आज दुपारपासून अमोल खताळ हे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण अमोल खताळ नेमके आहेत तरी कोण? याबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत.
कोण आहेत अमोल खताळ?
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हा अमोल खताळ हे भारतीय जनता पक्षात होते. निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हा सुजय विखे पाटील यांचे नाव संगमनेर साठी चर्चेत होते. त्यामुळे कुणीच अमोल खताळ यांना उमेदवारी मिळणार याबाबत शाश्वत नव्हते. मात्र ऐनवेळी संगमनेर ची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटली आणि येथून भारतीय जनता पक्षात असणारे अमोल खताळ यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली.
यासाठी खताळ यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केला. खताळ यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली तेव्हा चाळीस वर्षांचे आपले वर्चस्व बाळासाहेब थोरात यंदाही कायम राखणार असेच मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत होते. पण खताळ या निवडणुकीत जायंट किलर ठरलेत. खरे तर खताळ हे विखे पाटील यांचे निकटवर्तीय नेते.
त्यांच्या (अमोल खताळ) राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुद्धा विखे पाटील यांच्याप्रमाणेचं काँग्रेसमधून झालीये. मात्र पुढे त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) असा झालाय. या ठिकाणी एक गोष्ट विशेष आवर्जून नमूद करावीशी वाटते की अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. ते अगदीच सामान्य कार्यकर्ते आहेत.
विखे पाटील यांच्याशी जवळचे संबंध हीच काय त्यांची राजकीय पार्श्वभूमी. खताळ या आडनावामुळे अमोल खताळ यांचा संबंध महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्याशीही जोडला जातो, पण अमोल खताळ यांचा माजी मंत्री बी जे खताळ यांच्याशी कुठलाचं संबंध नाही. आपल्या राजकारणाच्या सुरुवातीला खताळ हे तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते.
विशेष बाब अशी की त्यांनी स्वतः बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते म्हणून काम सुद्धा पाहिले आहे. पुढे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचे संगमनेरमधील ठेकेदारीच्या मुद्द्यावर मतभेद झाले. बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात, असा अमोल खताळ यांचा आक्षेप होता.
पुढे त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम सुरू केलं. विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद सुद्धा दिलं. त्या काळात वर्षभरात त्यांनी सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फळी उभी केली. दरम्यान याचाही फायदा या विधानसभा निवडणुकीत खताळ यांना झाला आहे.