Benifit Of Donkeys Milk:- दूध म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने म्हशीचे किंवा गायीचे दूध पहिल्यांदा येते. त्यानंतर शेळी सारख्या प्राण्याचे दुधाचा आपण विचार करत असतो. परंतु यामध्ये जर आपण गाढविणीच्या दुधाचा विचार केला तर असे म्हटले जाते की गाढवणीच्या दुधाला सात ते दहा हजार रुपये प्रति लिटर इतका दर असतो.
गाढविणीच्या दुधाला पांढरे सोने असे देखील म्हटले जाते.कारण सोन्यासारखा भाव गाढविणीच्या दुधाला असतो. आपण जर गुजरात राज्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने गाढवीणीचे दूध विकले जाते.
त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी या दुधाला इतका दर का मिळतो किंवा खरच हे पोषक असते का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
गाढविणीच्या दुधाची का असते एवढी किंमत?
भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये गाढविणीच्या दुधाचा व्यापार नवीन आहे. भारतामध्ये जरी या दुधाची मागणी आणि लोकप्रियता सध्या वाढताना दिसून येत असली तरी प्रत्येक गाढवीण दिवसाला फक्त चार कप म्हणजेच अर्धा ते एक लिटर पर्यंत दूध देते. त्यामुळे हे दूध सहजासहजी उपलब्ध होत नाही.
तसेच हे दूध लवकर खराब होते. त्यामुळे इतर दुधाच्या तुलनेत या दुधाची किंमत जास्त असते. भारतामध्ये सध्या गाढवीणीच्या दुधाची मागणी वाढत असल्यामुळे हे दूध मिल्क पावडरच्या स्वरूपात देखील आता विकले जात आहे.
जर आपण या दुधाची किंमत बघितली तर ते दूध किती प्रमाणात उपलब्ध होते यावर सध्या ठरते. या दुधाचा वापर सौंदर्यप्रसाधनांसह औषध तयार करण्यासाठी देखील केला जातो. सध्या जर आपण गुजरात व दक्षिणेकडील काही राज्यांचा विचार केला तर या दुधाची मागणी वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक स्टार्टअप म्हणून या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे.
काय असतात गाढविणीच्या दुधाचे फायदे?
अलीकडच्या कालावधीमध्ये या दुधाची मागणी वाढताना दिसून येत आहे व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे लोकांना गाढवीनीच्या दुधाचे गुणकारी फायदे कळायला लागले आहे. तसेच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील काही जाणकारांकडून लोकांपर्यंत या दुधाचे महत्त्व पोहोचवले जात आहे.
प्राप्त माहिती नुसार बघितले तर गाढवीणीचे दूध चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करते. तसेच या दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो व त्वचा मऊ होते. गाईचे आणि गाढविणीच्या दुधामध्ये अनेक पौष्टिक साम्य असल्याचे बोलले जाते. या दुधामध्ये विटामिन डी आणि खनिजे असतात.
जर आपण हेल्थ लाईनच्या मते बघितले तर या दुधामध्ये कमी फॅट आणि कॅलरीज असतात. तसेच गाढविणीच्या दुधात असणारे प्रोटीन शरीरातील काही जिवाणू आणि विषाणूंना वाढण्यापासून रोखू शकतात. ज्या लोकांना गाईच्या दुधाच्या प्रथिनांची एलर्जी असते असे लोक गाढविणीच्या दुधाचे सेवन करू शकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे या दुधात केसीनची पातळी कमी असल्याने या दुधामुळे एलर्जी होत नाही.
तसेच या दुधाच्या सेवनाने वजन आणि उंची वाढवणे देखील शक्य आहे. शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करणारे लॅक्टोज आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असणारी खनिज या दुधामध्ये आढळून येतात. 2010 च्या प्रयोगशाळेतील एका अभ्यासानुसार बघितले तर हे दूध सायटोकाइन्स या प्रोटीनचे शरीरातील प्रमाण वाढवायला मदत करते.
हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, या दुधामुळे शरीरातील पेशी नायट्रिक ऑक्साईड तयार करतात व त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारण्यास तसेच रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
अँटीएजिंग आणि ब्युटी सप्लिमेंट प्रोडक्ट्स बनवण्यासाठी केला जातो वापर
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, गाढविणीच्या दुधाचा वापर ब्युटी सप्लिमेंट आणि अँटी एजिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय या दुधापासून बनवलेले चीज हे जगातील सर्वात महाग चीज मानले जाते. उत्तर सर्बीयामध्ये बनवलेल्या चीजची किंमत एक किलोला 70 हजार रुपये इतकी आहे.