गेल्यावर्षी बदल घडलेल्या, कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा मात्र वातावरण बदलल्याचं चित्र दिसत आहे. आमदार रोहित पवारांसोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी साथ सोडत विरोधात दंड थोपटल्याने यावेळच्या निवडणुकीत रंगत पहायला मिळत आहे. दुसरीकडे विधानस परिषदेवर संधी दिलेल्या राम शिंदेंनी दोन्ही तालुक्यात फिरत वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरु केलाय. यंदा भुमिपूत्रच, म्हणत रोहित पवारांविरोधात सर्व पक्षियांना एकत्र करण्याचा प्लॅन सध्या सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कर्जत-जामखेड मतदारसंघात पेरणी सुरु केली आहे.
रोहित पवारांना थेट आव्हान देणं सर्वच विरोधकांनी सुरु केलंय. मतदारसंघातील बँनरबाजी, राजकीय उलथापालथ, रोहित पवार विरोधकांच्या सभा या सगळ्याच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. बारामतीचं पार्सल यंदा परत पाठवायचा चंग अनेकांनी बांधल्यामुळे रोहित पवारांना यंदाची निवडणूक अवघड दिसत आहे. काय आहे कर्जत-जामखेडचं वारं..? रोहित पवारांची साथ का सोडताहेत दिग्गज नेते..? का वाढल्यात रोहित पवारांच्या पराभवाच्या शक्यता..? रोहित पवारांवर बुमरँग का होतंय..? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात फ्लेक्सबाजी सुरु केली. कुणाला सुपारीबाज, कुणाला छत्र्या, कुणाला बेडूक अशा उपमा देत करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे कर्जत-जामखेडकरांचा स्वाभिमान दुखावला. त्याच काळात रोहित पवारांचे कट्टर कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांची साथ सोडत त्यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला. ज्यांच्या जिवावर गेल्यावर्षीची निवडणूक जिंकली त्याच सरदाराने साथ सोडल्यावर रोहित पवार बँकफूटवर गेले.
शिवाय अजित पवार गटानेही रोहित पवारांविरोधात या मतदारसंघात मोर्चा उघडला. अजित पवार, जय पवार यांनी मतदारसंघात दौरे सुरु केले. त्यानंतर अचानक मतदारसंघाचं वातावरण बदललं. या सगळ्या विरोधकांना एकत्र करण्यात प्रा. राम शिंदेंना सध्यातरी यश आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे रोहित पवारांविरोधात सर्वच भुमिपूत्र एक होत, एकास-एक लढत देण्याचा विचार पुढे आला. त्यावर एकमत झाल्यानेच रोहित पवारांचा यंदा पराभव होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघात अजित पवारांचा सुरुवातीपासून दबदबा आहे. रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी गेल्यावेळी अजित पवारांची निर्णायक भूमिका होती. मात्र त्यानंतर राजकारणात बरीच उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले. त्याचा परिणाम या मतदारसंघावरही झाला. ही जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला असली तरी, रोहित पवारांविरोधात उमेदवारी देताना अजित पवार व मंत्री राधाकृष्ण विखे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रोहित पवारांना राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची झालेली घाईच, त्यांना बॅकफूटवर घेऊन जाताना दिसत आहे. त्यामुळे यंदा त्यांना बारामतीला परत पाठविण्यासाठी चांगलीच व्यूव्हरचना आखली जात आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात या सर्वांनी राम शिंदेंच्या नेतृत्त्वात सध्यातरी रोहित पवारांविरोधात रान पेटविले आहे. या मतदारसंघात यावेळी रोहित पवाारंविरोधात मराठा उमेदवार देण्याच्याची चर्चा आहेत. पण तरीही फडणवीसांना राम शिंदेंवर विश्वास टाकला तर मराठा मतांचे धृविकरण करणारे नेते हाताशी ठेऊन राम शिंदेंच्या पाठीशी मराठा व ओबीसी ताकद देण्याचा प्रयत्न सुरु आहे. परका व भुमिपूत्र याच मुद्यावर सध्या मतदारांचा ब्रेनवाँश करण्याचे काम सुरु आहे. हे सगळं पाहता रोहित पवारांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे.