Women Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी देखील शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत आहेत. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील काही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही देशात काही योजना सुरू आहेत. त्यापैकीच एक आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. या योजनेची सुरुवात मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने ही योजना अंमलात आली. 2017 मध्ये ही योजना सुरू झाली असून तेव्हापासून अविरतपणे सुरू आहे.
या अंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कोण-कोणती कागदपत्रे लागतात याबाबतही थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
योजनेचे स्वरूप
देशातील गरोदर महिलांचे आरोग्य सुधारावे, त्यांना चांगला सकस आहार मिळावा, कुपोषण सारख्या समस्या नष्ट व्हाव्यात या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत पात्र गरोदर अन स्तनदा महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
मात्र, ही रक्कम एकावेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा होत नाही. ही रक्कम तीन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात येते. पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर 1 हजार रुपये, गर्भधारणेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर 2 हजार आणि प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि पहिल्या लसीकरणानंतर 2 हजार रुपये मिळतात.
योजनेच्या पात्रता आणि अर्ज कुठे करायचा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेचे वय 19 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. तसेच ज्या महिला खाजगी क्षेत्रात नियमित नोकरी करत असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळू शकत नाही.
शासनाच्या इतर योजनांचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. या वेबसाईटवर गेल्यानंतर सिटीझन लॉगीन पर्यायावर क्लिक करुन नोंदणी करुन अर्ज दाखल करता येतो. याशिवाय नागरी सुविधा केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील या योजनेसंदर्भात माहिती उपलब्ध होते.
कागदपत्रे कोणती लागतात?
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गर्भवती महिलेचं आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड, गर्भवती महिलेंच पासबुक अन् पासपोर्ट साईजचा फोटो ही काही कागदपत्र आहेत जे की या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असतात.