वाळकी- अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील भूमीपुत्र तसेच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले महेंद्र रावसाहेब बोठे यांनी रायपूर, छत्तीसगढ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ८४ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत लाईट कॉन्टैक्ट गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
वाळकी येथील महेंद्र बोठे यांना बालपणापसून मैदानी खेळाची आवड होती. कुस्तीमध्ये त्यांना जास्तच रस असल्याने लहानपणीच कुस्तीतील डावपेच त्यांच्या अंगी भिणले होते. शालेय शिक्षण घेतानाच त्यांनी विविध ठिकाणी कुस्तीचे मैदान गाजवले. शालेय शिक्षण पूर्ण करून ते पोलीस दलात भरती झाले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असतानाही खेळाडू वृत्तीचा बाणा कमी होऊ न देता जोमाने वेगवेगळे खेळाचे प्रकार आत्मसात केले. किक लाईट प्रकारामध्येही बोठे यांनी रजतपदक पटकावले आहे.

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध वकील अॅड. बाजीराव बोठे यांचे महेंद्र बोठे हे धाकटे बंधू आहेत. दोन्ही बंधूंनी आप आपला व्यवसाय सांभाळत खेळाची आवड आजही जोपासली आहे. दोघांनी अनेक मॅरेथॉनमध्ये यश संपादन केले आहे. महेंद्र बोठे हे सध्या मीरा भायंदर येथे पोलीस दलात कार्यरत आहेत.
हिंजेवाडी, पुणे येथे २६ जून रोजी झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता. २० जुलै रोजी रायपूर, छत्तीसगढ येथे झालेल्या स्पर्धेत एक सुवर्णपदक व एकरजत पदक पटकावले. बोठे यांच्या कामगिरीची दखल घेऊन नोव्हेंबरमध्ये आबुदाबी येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. किक बॉक्सिग स्पर्धेसाठी त्यांनी कठोर मेहेनत घेतलेली होती. त्यांना जागतिक कीर्तीचे किक बॉक्सिंग प्रशिक्षक अक्षय पेडनेकर तसेच पालघर किक बॉक्सिंग जिल्हा अध्यक्ष सुर्यप्रकाश मुंडाभाट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
बोठे यांनी सुवर्णपदक पटकावून पोलीस दलाबरोबरच वाळकी गावचे नाव उंचावले आहे. बोठे यांच्या यशाबद्दल वाळकी ग्रामस्थांना अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. बोठे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, सरपंच शरद बोठे, उपसरपंच दादासाहेब कासार, पत्रकार ज्ञानदेव गोरे, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष रमाकांत बोठे, व्यापारी पंडीतआप्पा बोठे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी महेंद्र बोठे यांचे अभिनंदन केले आहे.