Rishabh Pant IPL 2024 : आयपीएल 2024 मार्चमध्ये सुरू होऊ शकते. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL 2024 मध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पीकेएसव्ही सागर म्हणाले की पंत लवकर बरा होत आहे आणि तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे.
पंत डिसेंबर २०२२ मध्ये हरिद्वारला जात असताना कार अपघातात जखमी झाला होता. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ४५ दिवस त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. ऋषभ पंत आता पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. पंत सध्या एनसीएमध्ये उपचार घेत असून, तो लवकरच मैदानावर खेळताना दिसेल.
पंत सध्या वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ जारी करून अपडेट्स देत आहे. अशातच ऋषभ पंत बेंगळुरूमध्ये नेटवर सराव करताना दिसला. अशास्थितीत पंत लवकरच खेळताना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सागर म्हणाला, ‘होय, आम्ही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करत आहोत. तो या मोसमात खेळेल अशी आशा करू शकतो. तो सर्वात मोठा खेळाडू आहे…जर तो खेळला तर ते आमच्यासाठी चांगले होईल. आमचे प्रशिक्षक आणि फिजिओ त्यांच्यावर काम करत आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो बरा होत आहे. मार्चपर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंतच्या पुनरागमनाची आशा व्यक्त केली आहे. पंतने अद्याप सराव सुरू केलेला नाही, पण तो आयपीएल २०२४ पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. या हंगामात पंत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केले आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.