IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. या वर्षी मार्चमध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होत असूनही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (BCCI) त्यांच्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2024 चे आयोजन करायचे आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, जगातील या सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा 17वा सीझन 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, आयपीएल 2024 चा अंतिम सामना यावर्षीच्या T20 विश्वचषक 2024 च्या पाच दिवस आधी 26 मे रोजी खेळला जाऊ शकतो.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएल 2024 च्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात, परंतु बीसीसीआयला संपूर्ण लीग भारतात आयोजित करण्याचा विश्वास आहे. भारतीय बोर्डाला संपूर्ण हंगामासाठी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळांकडून आश्वासन मिळाले आहे.
दरम्यान, आयपीएल हंगामासाठी ऋषभ पंतच्या उपलब्धतेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. फ्रँचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली कॅपिटल्सला आशा आहे की आगामी आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत खेळताना दिसेल. 30 डिसेंबर 2022 रोजी एका भीषण कार अपघातात जखमी झाल्यापासून पंत क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्याने मैदानावर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे उच्च अधिकारी पीकेएसव्ही सागर यांचा विश्वास आहे की, पंत फ्रँचायझीमधील त्यांच्या सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि 26 वर्षीय खेळाडू वेगाने बरा होत आहे. आणि तो यावर्षी मैदानावर खेळताना दिसेल.
यावेळी सागर म्हणाले, “होय, तो या मोसमात सर्वोत्तम खेळण्याची आम्हाला आशा आहे. तो सर्वात मोठा खेळाडू आहे…तो खेळला तर ते आमच्यासाठी चांगले होईल. आमचे प्रशिक्षक आणि फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो बरा होत आहे. आम्हाला आशा आहे की मार्चपर्यंत तो तंदुरुस्त होईल आणि आमच्यासाठी खेळेल.”