World Cup 2023 : सध्या वर्ल्ड कप सुरु असून, भारतीय संघाची कामगिरी यावेळी जबरदस्त राहिली आहे. दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून, सर्वांना या सामन्याची आतुरता लागून आहे. पण जर या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास काय होईल.अशा परिस्थितीत सामन्यासाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे, पण दुसऱ्या दिवशीही सामना न झाल्यास काय होणार? जाणून घ्या याबद्दल.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनल 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून, दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.
गेल्या एकदिवसीय विश्वचषकातही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. सामन्यादरम्यान पाऊस पडला, ज्यामुळे सामना राखीव दिवशी खेळला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. यावेळीही या दोन संघांमध्ये सामना रंगणार असून, मात्र जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट नुसार संघाला संधी दिली जाईल.
दरम्यान, भारतीय संघ सर्वाधिक 16 गुणांसह पॉईंट टेबलच्या पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नेदरलँडविरुद्ध भारताचा एक सामना बाकी आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर भारताचे एकूण 18 गुण होतील आणि जरी तो जिंकला नाही तरी टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहील. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ एकूण 10 गुणांसह पॉईंट टेबलच्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राखीव दिवशीही या दोघांमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा अडथळा ठरला, तर भारत थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
दरम्यान, भारताच्या या सामन्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असून, यावर्षी कोण विजेतेपद पटकावले हे पाहणं महत्वपूर्ण ठरेल.