Ahmednagar Rain : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. गेल्या जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती तयार झाली होती.
अतिवृष्टी सारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याची सुरुवात देखील अशीच दमदार झाली. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील नाशिक, पुण्यासारख्या भागात पूरस्थिती तयार झाली.
पण, आता गेल्या एका आठवड्यापासून राज्यातील हवामान कोरडे आहे. गेल्या सहा ते सात दिवसांच्या काळात राज्यात कुठेच मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली नाही.
यामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना नवीन उभारी मिळेल अशी आशा आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
19 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 15 ऑगस्टला देशातील तब्बल 19 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत देशातील अनेक भागांमध्ये स्वातंत्र्य दिन पावसात साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस ?
काल राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. पण आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहमदनगर या तीन जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात हवामान कोरडेच राहणार असल्याचे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या ठिकाणी हवामान खात्याचा कोणताच अलर्ट समोर आलेला नाही.