Ahmednagar Winter : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी थंडीची चाहूल जरा उशिराच लागली असून, डिसेंबर संपत आला असताना आता कुठे थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे खास उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहक वर्ग बाजारात दाखल झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून संपूर्ण जिल्हाच बोचऱ्या थंडीने गारठला असून, तापमान खाली आल्याने थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांनाही थंडीने हुडहुडी भरत आहे. यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. लोक शेकोट्या पेटवून त्या भोवती गप्पा मारताना दिसत आहेत.
थंडीपासून बचावासाठी शेकोटी आधार ठरत आहे. या ऋतूमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवा सह पशू-पक्षांनाही जाणवत असून प्रातःकाळी होणारा पक्षांचा कलकलाट सध्या ऐकू येईनासा झाला आहे प्रत्येकजण दररोज सकाळी सुर्यनारायणाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
सकाळी १० वाजेपर्यंत कोवळे ऊन प्रत्येकाला हवेहवेसे वाटत आहे. ग्रामीण भागातील शाळांची वेळ दररोज जरी उशीरा असली तरी आठवड्यातून एकदा येणाऱ्या शनिवारी मात्र ७.३० वाजता शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांना कुडकुडतच अभ्यासाचे धडे गिरवावे लागत असल्याने सध्यातरी शनिवार हा त्यांच्या नावडीचा ठरत आहे.
या दिवशी शाळेतील विद्यार्थी संख्येत घट होत असल्याचे जाणवत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी व रात्री घराबाहेर पडणारांची संख्या रोडावली आहे, पहाटे गार हवा वाहत असल्याने व तापमानात घट झाल्याने स्वेटर्स, मफलर, कानटोपी, कानपट्टी, हातमोजे यासारख्या थंडीपासून शरीराचे रक्षण करणाऱ्या कपड्यांना मागणी वाढली आहे.
सर्दि, खोकल्यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली असून रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गहु, हरभरा या पिकांसाठी ही थंडी पोषक असल्याने शेतकरी समाधानी आहेत. दूध उत्पादक, कामगार, नोकरवर्ग, मजूर यांना मात्र थंडी असूनही आपल्या नियोजित वेळेतच आपली कामे करावी लागत आहेत.
विजेचे भारनियम व लपंडावामुळे शेतकऱ्यांना मात्र रात्री अपरात्री कडाक्याच्या थंडीतही पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. थंडीचा जोर ग्रामीण भागात अधिक असल्याने दिवस मावळताच रस्ते ओस पडत असून, जागो जागी शेकोट्या पेटवून उबदार गप्पांचा फडही रंगत आहे.
यावर्षी म्हणावी तशी थंडी जाणवत नव्हती, मात्र गेल्या आठवडा भरापासून थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर तिची तीव्रता अधिकच जाणवत आहे.
त्यामुळे नागरिकही गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. हवामानाचा हा लहरीपणा आणखी काही दिवस नागरीकांना सोसावा लागणार आहे.