Maharashtra Rain : राज्यातील विविध भागांमध्ये सातत्याने अतिवृष्टी होत आहे. काही ठिकाणी एका महिन्यात किंवा १५ दिवसांत जेवढा पाऊस पडायला पाहिजे तेवढा पाऊस दोन-तीन दिवसांत पडत आहे.
तसेच या पावसाच्या पाण्याचा निचरा तेवढ्या वेगाने होत नाही. तिथेच पाणी जमा होते. त्यातून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. सगळीकडे अलर्ट देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी होणार असेल तिथे काळजी घेतली जाते. केंद्र व राज्य आपत्ती दल वेळेत आपत्तीच्या ठिकाणी पोहोचून मदतकार्य करत आहे आताही ज्या ठिकाणी अतिवृष्टीबाबत अलर्ट मिळत आहेत,
त्या ठिकाणी प्रशासनाला पूर्णपणे अँलर्ट मोड’बर ठेवण्यात आले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. फडणवीस म्हणाले अतिवृष्टीचा अंदाज आला तरी ती किती मोठ्या प्रमाणात होणार आहे,
याचा तंतोतंत अंदाज येणे कठीण असते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस काही भागांत होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, परिस्थिती कुठलीही असली तरी केंद्र, राज्य आपत्ती दलासोबत स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी कार्यरत आहे. नुकत्याच पेरण्या झालेल्या होत्या,
अशा ठिकाणी देखील पुरामुळे नुकसान झाले आहे. याकरिता जिथे नुकसान होते तिथे पंचनामा केला जातो, असे ते पिकांच्या नुकसानीविषयी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आल्यानंतर त्यांच्या आमदारांना जास्त निधी दिल्याचा आरोप होत असल्याबाबत फडणवीस यांना विचारले असता,
फक्त त्यांनाच नाही तर भाजप, शिवसेना व इतर आमदारांनाही निधी वाटप होत आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीला निधी दिला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.