Ahmednagar News : तालुक्यातील कवडगाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जवळके येथे वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
शनिवारी दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. तसेच ढग देखील भरून आले होते पाच वाजण्याच्या सुमारास आरणगावसह कवडगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कवडगाव येथील शेतकऱ्यांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेकांचे घरे पडले आहेत तसेच शेतामधील असलेले कांद्याचे व गव्हासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आधीच शेतमालाचे भाव कोसळलेले असताना परत अवकाळी पावसाने नुकसान झाले. अतिशय दुष्काळी परिस्थिती असल्याने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.