हवामान

Havaman Andaj : होळीआधीच नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके !

Havaman Andaj : साधारण होळीनंतर उन्हाच्या झळा लागतात, असे मानले जाते. मात्र सद्यस्थितीत वातावरणातील सततच्या बदलामुळे ऋतुचक्र पूर्णतः बदलले असून मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

सुरुवातीला ३३ अंश एवढे तापमान असताना बुधवारी तापमानात वाढ होत ते ३६ अंशावर पोहोचले. परिणामी यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

मार्चचा पहिलाच आठवडा उकाडा घेऊन उगवला. पहिल्याच आठवड्यात मुंबईचे तापमान ३३ अंशावर गेले. उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी त्यात भर घातली आणि तापमान आणखी वाढत गेले.

होळीच्या आधीच मुंबापुरीत उन्हाचे चटके वाढायला लागल्याने नागरिकांना छत्री, स्कार्फ, टोपी यांचा आधार घ्यावा लागत आहे. अशातच बुधवारी सूर्याच्या प्रकोपामुळे पारा ३६ अंशांवर जाऊन पोहोचला.

पुढचे दोन दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा जोर वाढल्याने पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातही उष्ण लहर कायम राहील, असे बोलले जात आहे.

दरम्यान, हे तापमान मार्च महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त असल्याचे हवामान खात्याने सांगितले. केवळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांतच नाही तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

‘एल निनो ‘च्या प्रकोपामुळे यंदा उन्हाळा लवकर येणे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा लागत आहेत. – प्रा. गुरफान बेग, संस्थापक, सफर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts