Weather News : यंदा हवामान वर्षभर विषम राहिले. पावसाळा असो की हिवाळा वातावरणात एकसारखेपणा राहिलाच नाही. तीनही ऋतूंवर हवामान बदलाचा परिणाम झालेला आहे. परतीचा पाऊस अर्थात मान्सून राज्यातून संपल्यानंतर आजपर्यंत साधारण ७० दिवस झाले आहेत.
या ७० दिवसापैकी १४ दिवस नगर शहर व जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय. नोव्हेंबरमध्ये ९ दिवस, डिसेंबरमध्ये ३ दिवस, तर जानेवारीतही २ दिवस पाऊस झाला, त्याचा परिणाम रब्बी हंगामातील ज्वारी, गहूव हरभरा पिकांवर झाला आहे.
काल मंगळवारी दिवसभर विचित्र वातावरणाचा सामना करावा लागला. दिवसभर थंड वाऱ्याबरोबर अवकाळी पावसानेही हजेरी लावली. दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नगर शहर व परिसरात पावसाचा जोर होता.
अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता मागील सहा वर्षांपासून अवकाळी पाऊस होत आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी साडेसहा वाजेदरम्यान शहर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेनंतर रिमझिम सुरू झाली, पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
कधी पर्यंत राहील असे वातावरण
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता संगितली असून पुढील ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
मान्सून गेल्यानंतर ‘या’ तारखेंना बरसला अवकाळी
नोव्हेंबर – ११, २२, २३, २५, २६, २७, २८, २९, ३०
डिसेंबर – १, २ व ६
जानेवारी – ६ व ९
पिकांसह आरोग्यावरही ‘संक्रांत’
सध्याच्या अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे पिकांसह मानवी आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकला आदिंसारखे आजार वाढले आहेत. गव्हाच्या पिकावर मावा पडण्याची शक्यता आहे. हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव, कांदा पिकावर करपा रोगाचा परिणाम होण्याची श्यक्यता आहे.