Maharashtra Havaman : राज्यातून पाऊस परतल्यानंतर ऑक्टोबर हीटच्या चटक्याने नागरिक हैराण झाले. मात्र, आता थंडीची चाहूल लागली असून, गुरुवारी राज्यात सर्वात किमान जळगावमध्ये ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.
पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील तापमानात मागील चार ते पाच दिवसांपासून घट दिसू लागली आहे.
किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पहाटे थंडी जाणवू लागली आहे. दुपारच्या तापमानातही घट झाली आहे;
परंतु राज्यातील बहुतांश भागात दुपारी ऑक्टोबर हीटचा चटका अजूनही जाणवतोय. राज्यात गुरुवारी सर्वात जास्त कमाल तापमान रत्नागिरीत ३६.४ अंश सेल्सिअस इतके होते.
इतर शहरांचे कमाल तापमान ३१ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. कोकण भाग वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात किमान तापमान घटले आहे.
राज्यात २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
तर राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही.
थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज : रत्नागिरीत सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद